पुणेकरांसाठी खुशखबर ; पुणे- नांदेड वंदे भारतला रेल्वे मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल..

पुणे : पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी. पुण्याला आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत पुण्याहून नांदेडला वंदे भारत धावण्याची शक्यता आहे. या एक्सप्रेसला रेल्वे मंत्रालयाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला आहे.त्यामुळे
नांदेडहून पुण्याला जाणाऱ्या कामगार, विद्यार्थी अन् प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी नांदेड वंदे भारत एक्सप्रेससाठी पाठपुरावा करत केंद्रीय मंत्री अश्वणी वैष्णव यांची भेट घेतली. नांदेड आणि पुणे वंदे भारत एक्सप्रेससाठी रेल्वे मंत्र्यांकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. त्यामुळे नांदेड ते पुणे फक्त सात ते आठ तासात अंतर पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि मेहनत देखील वाचणार आहे. लातूर, धाराशिव या दोन जिल्ह्यांनाही या वंदे भारत एक्सप्रेसचा फायदा होणार आहे. आता रेल्वे मंत्रालय लवकरच याबाबत अधिकृत वेळापत्रक आणि तारखा जाहीर करेल, अशी अपेक्षा आहे.
नांदेड-पुणे वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यास प्रवासाचा वेळ कमी होईल. ५५० किमी अंतर ही ट्रेन ७-८ तासांत प्रवास पूर्ण करेल, अशी अपेक्षा आहे. नांदेड, लातूर, धाराशिव या मार्गावर यांसारख्या प्रमुख स्थानकांवर थांबे असण्याची शक्यता आहे. वंदे भारतच्या आधुनिक सुविधांमध्ये एसी चेअर कार, हाय-स्पीड वाय-फाय, आरामदायी सीट्स आणि प्रगत सुरक्षा यंत्रणा यांचा समावेश आहे. नांदेड ते पुणे या वंदे भारत एक्सप्रेसचे भाडे साधारण ₹१५००-२००० (चेअर कार) आणि ₹२०००-२५०० (एक्झिक्युटिव्ह क्लास) असण्याची शक्यता आहे.