दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी! पुणे बोर्डाची मोठी घोषणा, विद्यार्थ्यांना दिलासा…

पुणे : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) जुलै-ऑगस्ट २०२५ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी नव्या खासगी विद्यार्थ्यांना प्रथमच सहभागाची संधी देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
यापूर्वी फक्त फेब्रुवारी-मार्चच्या मुख्य परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनाच पुरवणी परीक्षेला बसण्याची परवानगी होती. आता मात्र, शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये या उद्देशाने नव्या खासगी विद्यार्थ्यांनाही ही संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या कालावधीत आणि नियमांचे पालन करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, नव्या खासगी विद्यार्थ्यांना फॉर्म नंबर १७ भरून दहावी किंवा बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करता येईल. नोंदणी ही ऑनलाइन पद्धतीनेच करावी लागेल. १५ एप्रिल २०२५ ते १५ मे २०२५ या कालावधीत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरता येतील.