दिवाळीपर्यंत सोन्याच्या दरात मोठी तेजी येणार, 1 तोळा सोन्याची किंमत गगनाला भिडणार, जाणून घ्या…

पुणे : गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या दरात मोठी तेजी दिसून आली. या तेजीमुळे सोन्याच्या दराने एक लाख रुपयांचा टप्पा सुद्धा गाठला. पण गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार दिसून येत आहेत. असे असतानाच आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

सोन्याचया दरात पुन्हा मोठी तेजी येणार असून सोने नव्या उच्चांकावर पोहोचणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आता दिवाळीच्या सणासुदीच्या काळात यामध्ये आणखी वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, 1 तोळा सोनं 1,10,000 ते 1,12,000 रुपये दरम्यान विकले जाण्याची शक्यता असून, गुंतवणूकदार आणि दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी ही मोठी बातमी ठरू शकते. सोमवारी एमसीएक्सवर सोन्याच्या 29 ऑगस्ट एक्सपायरी कॉन्ट्रॅक्टमध्ये 1,01,210 रुपयांचा उच्चांक नोंदवण्यात आला.

आंतरराष्ट्रीय COMEX मार्केटमध्ये सोनं 3430 डॉलर प्रति औंसवर पोहोचलं आहे. ही वाढ थांबण्याची चिन्हं नसून, अजूनही तेजी कायम राहणार असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
Emkay Global Financial Services च्या रिसर्च अॅनालिस्ट रिया सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, जागतिक तणाव, डॉलरची अस्थिरता, आणि मध्यवर्ती बँकांची वाढती खरेदी यामुळे दिवाळीत सोन्याचे दर विक्रमी पातळीवर पोहोचतील. यासोबतच चांदीचाही दर 1 किलोसाठी 1,20,000 ते 1,25,000 रुपये दरम्यान राहील, असा अंदाज आहे.
भारतासह चीन, रशिया, तुर्की आणि कझाकिस्तानसारख्या देशांनी मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केली आहे. रशिया-युक्रेन युद्ध, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील कमकुवत आकडेवारी आणि ट्रम्प सरकारच्या नवीन टॅरिफमुळे सोन्याकडे पुन्हा सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिलं जात आहे.