सोनं गडगडलं! चांदीच्या दरातही मोठी पडझड; आजचा भाव पाहिलात का?

मुंबई : जागतिक बाजारपेठेत वाढलेल्या अनिश्चिततेचा परिणाम सोमवारी सराफा बाजारावर दिसून आला. अमेरिका-इराण तणाव, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि जागतिक आर्थिक घडामोडींमुळे सोने व चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवली गेली. त्यामुळे मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

एमसीएक्सवर सोमवारी बाजार सुरू होताच सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,54,177 रुपयांवर खुला झाला. मात्र काही वेळातच विक्रीचा दबाव वाढल्याने तो 1,53,596 रुपयांच्या नीचांकी पातळीपर्यंत घसरला. सकाळच्या सत्रात गोल्ड फ्युचर्स सुमारे 1.12 टक्क्यांच्या घसरणीसह 1,53,822 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत होते.
चांदीच्या दरातही मोठी पडझड पाहायला मिळाली. एमसीएक्सवर चांदी 2,51,001 रुपये प्रति किलो दराने खुली झाली होती. मात्र नंतर ती घसरून 2,41,990 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आली. सिल्व्हर फ्युचर्समध्ये 2.21 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली.

देशांतर्गत बाजारासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीवर दबाव कायम राहिला. कॉमेक्स बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली, तर चांदीच्याही किमती खाली आल्या.

बाजार तज्ज्ञांच्या मते, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे जागतिक महागाईची चिंता पुन्हा वाढली आहे. तसेच अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह व्याजदर कपातीबाबत सावध भूमिका घेण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांकडून नफा वसुली होत आहे. यामुळे सोने आणि चांदीच्या दरांवर दबाव निर्माण झाला आहे.
तज्ज्ञांच्या मते, आगामी आर्थिक आकडेवारी आणि जागतिक घडामोडींवर आता सराफा बाजाराची पुढील दिशा अवलंबून असणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सोने-चांदीच्या दरात आणखी चढ-उतार पाहायला मिळू शकतात.