उरुळी कांचन येथील शेळी चोर स्थानिक गुन्हे शाखेने केले जेलबंद, इंदापूर तालुक्यात चोरत होते शेळ्या मेंढ्या…

उरुळी कांचन : गेल्या काही दिवसांपासून इंदापूर व वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून शेळ्या व बोकड चोरी गेल्याच्या घटनेत वाढ झाली होती. त्या अनुषंगाने चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना वरिष्ठांकडून स्थानिक गुन्हे शाखेला देण्यात आल्या होत्या. त्यानुसार पथक गस्त घालीत असताना मिळालेल्या माहितीनुसार वालचंदनगर व इंदापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत टोळीने आंबळे रेल्वे स्टेशन येथून कॉपर वायर चोरुन आणलेल्या आहेत. ही टोळी या वायर जाळत बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार सदर पथक त्या भागात पोहोचले असता पाच इसम काही तरी जाळत बसल्याचे दिसून आले. पोलिसांची चाहूल लागलाच सर्वजण पळून जाऊ लागले. यावेळी पोलिसांनी रोहित कटाळे याला पकडले. त्याने साथीदारांसह वालचंदनगर, इंदापूर व यवत पोलिस ठाण्याच्या हद्दीत शेळी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपी रोहित कटाळे याच्या मदतीने त्याचा साथीदार साहिल चौधरी याला उरुळी कांचन येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
यामध्ये रोहित दत्तात्रेय कटाळे, साहिल विलास चौधरी (दोघेही रा. उरुळी कांचन) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तसेच वैभव ऊर्फ गोट्या तरंगे, सचिन अरुण कांबळे व खंडू महाजन अशी फरार असलेल्या तिघांची नावे आहेत. आरोपींवर इंदापूर, वालचंदनगर व यवत पोलिस ठाण्यात विविध आरोपांखाली अनेक गुन्हे दाखल आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, दत्ताजी मोहिते, तसेच वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, सहायक फौजदार बाळासाहेब कारंडे, पोलीस हवालदार स्वप्नील अहिवळे, अभिजीत एकशिंगे, निलेश शिंदे, राजु मोमीन, अतुल ढेरे, योगेश नागरगोजे, अमोल शेंडगे यांनी याबाबत तपास केला.
दरम्यान, इंदापूर, वालचंदनगर व यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतून शेळ्या व बोकड चोरणाऱ्या टोळीला स्थनिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. तर तिघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. आरोपींनी 8 लाख 50 हजार रुपये किमतीचे शेळ्या व बोकड चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. याबाबत तपास सुरू आहे.