मोबाईलवर फोटो पाठवून मुलींची निवड; मग कात्रजच्या ‘त्या’ लॉजमध्ये बोलावलं अन्…, दरवाजा उघडताच उघड झाला काळा धंदा


पुणे : पुण्यातील कात्रज परिसरात सुरू असलेल्या देहव्यापाराच्या रॅकेटचा भारती विद्यापीठ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. व्हॉट्सॲपद्वारे महिलांचे फोटो पाठवून ग्राहकांशी संपर्क साधला जात होता. त्यानंतर ग्राहकांना कात्रजमधील एका लॉजवर बोलावून देहव्यापार चालवला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या मदतीने सापळा रचत कारवाई केली आणि दोन परराज्यातील तरुणींची सुटका केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ जुलै २०२६ रोजी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याला कात्रज येथील एका लॉजमध्ये देहव्यापार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीची खातरजमा करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने बनावट ग्राहक तयार करून दलालांशी संपर्क साधला.

मुख्य आरोपी तुकाराम दत्ता मनाळे याने बनावट ग्राहकांना कात्रज येथील किनारा लॉज येथे बोलावले. ग्राहकांकडून पैसे घेतल्यानंतर त्यांना खोलीत पाठवण्यात आले. ठरलेल्या संकेत मिळताच पोलिसांनी लॉजवर धाड टाकली. कारवाईदरम्यान खोलीत दोन परराज्यातील तरुणी आढळून आल्या. त्यांची सुटका करण्यात आली असून त्यांना आवश्यक मदत पुरविण्यात आली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी तुकाराम दत्ता मनाळे (वय २२, सध्या रा. तीनहत्ती चौक, संभाजीनगर, धनकवडी, पुणे) याला अटक केली आहे. त्याच्यासह आणखी दोघांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या रॅकेटशी संबंधित इतर आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांकडून या रॅकेटची व्याप्ती, त्यामागील इतर व्यक्ती आणि संभाव्य मानवी तस्करीच्या दुव्यांचाही तपास केला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!