गॅस सिलेंडर चोरीला गेला किंवा हरवला तर हजारोंचा फटका? कनेक्शन बंद होणार की नवीन सिलेंडर मिळणार; जाणून घ्या नियम
पुणे : एलपीजी गॅस सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अनेकदा सिलेंडर चोरीला जाणे किंवा हरवण्याच्या घटना घडतात. अशा वेळी गॅस कनेक्शन रद्द होते का, नवीन सिलेंडर मिळतो का आणि दंड भरावा लागतो का, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो. मात्र, नियमांनुसार योग्य प्रक्रिया पूर्ण केल्यास कनेक्शन बंद होत नाही आणि नवीन सिलेंडर मिळू शकतो.

सिलेंडर हरवल्याचे किंवा चोरीला गेल्याचे लक्षात येताच सर्वप्रथम जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवणे आवश्यक आहे. तक्रारीत सिलेंडरवरील युनिक क्रमांक नमूद करणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर संबंधित गॅस एजन्सीला घटनेची माहिती देऊन मूळ सबस्क्रिप्शन व्हाउचर, कनेक्शनधारकाचे ओळखपत्र आणि एफआयआरची प्रत सादर करावी लागते.
गॅस एजन्सी कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू करते. सिलेंडर हरवल्यामुळे कनेक्शन आपोआप रद्द होत नाही. मात्र, नियमांनुसार ग्राहकाकडून 1,000 ते 3,000 रुपये इतकी अनामत रक्कम किंवा दंड आकारला जाऊ शकतो. सिलेंडरसोबत रेग्युलेटरही हरवला असल्यास ही रक्कम अधिक असू शकते.

सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि आवश्यक शुल्क भरल्यानंतर ग्राहकाला नवीन सिलेंडर दिला जातो. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही दिवस लागू शकतात. त्यामुळे सिलेंडरची सुरक्षितता राखणे आणि चोरी किंवा हरवल्यास तातडीने पोलिस तसेच गॅस एजन्सीशी संपर्क साधणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
