Ganpat Gaikwad : मोठी बातमी! भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या अडचणीत मोठी वाढ…
Ganpat Gaikwad : कल्याणचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या अडचणीत आणखी वाढत आहेत. पोलीस स्टेशनमधील गोळीबार प्रकरणानंतर गणपत गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली आहे. गणपत गायकवाड यांच्याविरोधात उल्हासनगर-हिल लाईन पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यासह अन्य शिवसैनिकांवर गोळीबार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे सगळीकडे खळबळ उडाली असून संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. अशातच आता गणपत गायकवाड यांच्याविरोधात उल्हासनगर-हिल लाईन पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी कल्याण येथील द्वारली गावातील जमीन मालकाला जातीवाचक शब्द वापरल्याने गणपत गायकवाड यांच्यासह इतर सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या वादाचे कारण राजकीय आहे. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ हा या वादाचे मोठे कारण आहे.
कारण या मतदार संघामध्ये मागील पंधरा वर्षांपासून गणपत गायकवाड यांची सत्ता आहे. त्यांना मात देण्यासाठी सध्या शिवसेनेकडून जय्यत तयारी सुरु आहे. यासाठी शिवसेनेचे शहरप्रमुख आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक महेश गायकवाड देखील जोरात प्रयत्न करत आहेत. Ganpat Gaikwad
यामुळे गणपत गायकवाड अस्वस्थ झाले. गणपत गायकवाड हे दोन वेळा कल्याण पूर्वमधून अपक्ष निवडून आले असून सत्ता बदल असल्याने ते राष्ट्रवादीत गेले. पुन्हा २०१९ ची विधानसभा निवडणूक भाजपकडून लढवली.
शिवसेनेकडून कल्याण पूर्व मतदार संघावर लक्ष केंद्रीत करून मागील दोन वर्षापासून महेश गायकवाड यांनी या भागातील नागरी समस्या, विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी काम सुरु केले. शिवसेनेचे ते माजी नगरसेवक होते.
खासदार शिंदे यांचे सहकार्य त्यांना मिळत असल्याने महेश गायकवाड यांच्या कामांची चांगलीच चर्चा होऊ लागली होती. याच कारणामुळे गणपत गायकवाड अस्वस्थ झाले. त्यामुळे आता पुन्हा गायकवाड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.