पत्नीसह तिच्या मित्राच्या त्रासाला वैतागून पतीने केली आत्महत्या, भयंकर माहिती आली समोर…

पुणे : पत्नी आणि तिच्या मित्राच्या सततच्या त्रासाला कंटाळून ३९ वर्षीय पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तसेच या प्रकरणी पत्नीसह तिच्या मित्राविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अतुल मारुती कदम (वय. ३९, रा. बालाजी कॉम्प्लेक्स, नाना पेठ) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. त्यांची आई माधुरी मारुती कदम (वय. ६१) यांनी याबाबत समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, पत्नी सोनाली अतुल कदम (वय. ३१, रा. साडेसतरानळी, हडपसर) आणि तिचा मित्र कृष्णा शिंदे (रा. हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, अतुल आणि सोनाली यांचा २०१५ मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर दोघांमध्ये सातत्याने वाद होत होते. अतुलला पत्नी सोनालीचे कृष्णा शिंदेशी घनिष्ठ संबंध असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांच्यात वाद अधिकच वाढले आणि सोनाली वेगळी राहू लागली.

त्यानंतर सोनाली व तिचा मित्र कृष्णा शिंदे यांनी अतुलला फोनवरून धमकावले. या मानसिक छळाला कंटाळून अतुल यांनी १५ जून २०२५ ला गळफास घेऊन आत्महत्या केली. पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी सोनालीला गुरुवारी न्यायालयात हजर केले होते.

दरम्यान, या प्रकरणात आरोपी कृष्णा शिंदेचा शोध घ्यायचा आहे. दोन्ही आरोपींनी अतुल कदमला मानसिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असून, त्यामागे आरोपींचा काय उद्देश होता याचा तपास करायचा आहे. त्यासाठी आरोपी सोनालीला पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकील रेणुका देशपांडे-कर्जतकर यांनी केली. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीला १३ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.