विद्यार्थीनीचा लैगिक छळ प्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…

बीड : तीन दिवसांपूर्वी बीड येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका विद्यार्थिनीवर दोन शिक्षकांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दोन्ही नराधम आरोपींना सफारी गाडीतून पळून जाताना अटक केली आहे.
या अटकेनंतर आता परळीचे आमदार आणि अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी मोठा गौप्यस्फोट घेतला आहे. विद्यार्थिनीचं लैंगिक छळ करणारा आरोपी हा बीडचे आमदार संदीप क्षिरसागर यांचा राईट हँड असल्याचा गौप्यस्फोट धनंजय मुंडे यांनी केला आहे.
तसेच दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली नाही, तर त्यांनी स्वत: पोलिसांकडे सरेंडर केले आहे. त्यामुळे दोन्ही आरोपी आणि संदीप क्षिरसागर यांचे सीडीआर काढावेत, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.
ज्या रात्री गुन्हा नोंद झाला. त्याच दिवशी अकरा वाजता बीडचे आमदार संदीप क्षिरसागर हे आरोपीसोबत होते. हे पोलिस तपासात समोर येणं आवश्यक आहे. ते सोबत का होते? यामागचं कारण काय? आरोपीचे आणि आमदारांचे कनेक्शन काय, हे कळायला हवे. ज्या दिवशी ही घटना घडली, त्या दिवशीचे तीन जणांचे सीडीआर काढणे फार महत्त्वाचे आहे, अशी मागणी मुंडे यांनी केली.
धनंजय मुंडे म्हणाले, ‘ज्या कोचिंगला आमची भगिनी माय माऊली जात होती. त्याच कोचिंगच्या मालकाने आणि पार्टनरने तिच्यावर अत्याचार केला. यांच्यावर ज्याचा राजकीय वरदहस्त आहे, जे बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी हे मिळून कारस्थान केलं का? जेव्हा हे प्रकरण समोर आलं.
त्यानंतर इतर अनेक पीडित कुटुंबं समोर आली. आमचं नाव कुठेही घेऊ नका, आम्हीही त्यांचे पीडित आहोत, असे हुंदके देऊन त्यांनी सांगितले. आज संदीप क्षिरसागर ज्या घरात राहतात, त्या घराचा मालक कोण आहे? ते आपण शोधून काढावे, असे आवाहन मुंडेनी पत्रकारांना केलं.
आरोपी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर हे दोघं बीडमधील प्रसिद्ध उमा किरण शैक्षणिक संकुलात काम करतात. दोघांनी उमा किरण शैक्षणिक संकुलात क्लासेससाठी येणाऱ्या अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केला. मागील दहा महिन्यांपासून आरोपी तिचं शोषण करत होते. पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनुसार, तिने एप्रिल २०२४ मध्ये उमा किरण कोचिंग क्लासेस येथे नीट चे क्लासेस लावले होते.
ती सकाळी ०९.०० ते १२.०० पर्यंत क्लासेसच्या अभ्यासिकेत अभ्यास करायची. तर दुपारी २ ते ६ या कालावधीत तिचे लेक्चर्स असायचे. जुलै २०२४ पासून प्रशांत खाटोकर याने मुलींचा छळ करायला सुरुवात केली होती. मुलगी दुपारी बारा वाजता अभ्यासिकेतून बाहेर पडल्यानंतर आरोपी खाटोकर अभ्यासिकेच्या खाली जाऊन थांबायचा. माझ्यासोबत चल, गाडीवर बस, मी तुला घरी सोडतो, असे आरोपी शिक्षक म्हणायचा. यासाठी विद्यार्थिनीने त्याला विरोध केल्यानंतर तो तिच्यावर दबाव टाकून बसवून घेऊन जायचा.