क्रेशर प्लांटच्या वादातून रक्तरंजित थरार! ७० ते ८० जणांचा घरात घुसून हल्ला; भाजपचे माजी आमदार अतर सिंह भडाना यांचा मृत्यू

भरतपूर, राजस्थान : बंद पडलेला क्रेशर प्लांट पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न आणि स्थानिकांचा विरोध, यातून राजस्थानमध्ये रक्तरंजित संघर्ष घडला. भाजपचे माजी आमदार अतर सिंह भडाना यांच्यावर झालेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी भरतपूर जिल्ह्यातील भोंडा गावात घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ७० ते ८० जणांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली असून, भडाना यांचे सहकारी गगन शर्मा हेही गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर गावात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

वर्षभरापासून बंद असलेल्या प्लांटवरून वाद
मिळालेल्या माहितीनुसार, भडाना हे रविवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास क्रेशर प्लांट परिसरात उपस्थित होते. हा प्लांट गेल्या वर्षभरापासून बंद होता आणि तो पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, प्लांटच्या कामकाजावरून स्थानिक ग्रामस्थ आणि भडाना यांच्यात दीर्घकाळापासून वाद सुरू होता. चराईच्या जमिनीवर अतिक्रमण आणि बेकायदा खाणकाम केल्याचे आरोप ग्रामस्थांनी केले होते. प्लांट सुरू करण्यास विरोध करत काही ग्रामस्थांनी गेल्या १० ते १५ दिवसांपासून शांततापूर्ण आंदोलन सुरू असल्याचाही दावा केला आहे.


लाठी-काठ्यांनी हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू
रविवारी प्लांट परिसरात दोन्ही बाजूंमध्ये संघर्ष झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, अतर सिंह भडाना आणि त्यांचे सहकारी गगन शर्मा यांच्यावर काठ्या आणि दगडांनी हल्ला करण्यात आला. दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना प्रथम वैर येथील रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर भडाना यांना जयपूरमधील सवाई मानसिंग रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे रात्री साडेअकराच्या सुमारास उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. गगन शर्मा यांना भरतपूर येथे उपचारासाठी पाठवण्यात आले.
पत्नीचा प्रशासनावर आरोप
भडाना यांच्या पत्नी कमलेश यांनी पोलीस आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. क्रेशर प्लांटची वीजजोडणी तोडण्यात आली, पाण्याचा पंप खराब करण्यात आला आणि परिसरातून काही लोकांना पळवून नेले जात असल्याचे त्यांनी आरोपांत म्हटले आहे. या प्रकारांची माहिती प्रशासनाला दिल्यानंतरही कारवाई झाली नसल्याचा त्यांचा दावा आहे.
दोन्ही बाजूंचे आरोप; तपास सुरू
दुसरीकडे, ग्रामस्थांनी भडाना यांच्यासोबत आलेल्या ४० ते ५० जणांनी आंदोलनस्थळावरील लोकांना हटवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे संघर्ष नेमका कसा सुरू झाला, याबाबत दोन्ही बाजूंकडून वेगवेगळे दावे करण्यात आले आहेत. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून, गावातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले आहेत. या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
या घटनेमुळे राजस्थानच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, क्रेशर प्लांट आणि खाणकामाच्या वादातून घडलेल्या या जीवघेण्या संघर्षाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
