इतिहासात प्रथमच!कोल्हापुरात तृतीयपंथी संघटना चालवणार रेशन दुकान, महसूल विभागाचा मोठा निर्णय

कोल्हापूर : समाजातील सर्व घटकांना समान संधी मिळावी या उद्देशाने कोल्हापूर जिल्ह्यात एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. तृतीयपंथी संघटनांना रेशन चालवण्याची परवानगी महसूल खात्याकडून देण्यात आली आहे.तृतीयपंथीयांसाठी मिळालेल्या पहिल्या रेशन दुकानामुळे समाजात ऐतिहासिक पाऊल टाकल्याचे सांगितले जात आहे.

तृतीयपंथी समुदायाच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या मैत्री संघटनेला रेशन दुकान चालविण्याची परवानगी महसूल विभागाकडून देण्यात आली आहे. हा निर्णय शनिवारी अधिकृतपणे जाहीर करण्यात आला असून देशभरात पहिल्यांदाच तृतीयपंथी समाजाला रेशन दुकान चालविण्याची संधी मिळाल्याने कोल्हापूरच्या नावावर एक अभिमानास्पद नोंद झाली आहे.या निर्णयामुळे तृतीयपंथीय समाजाला केवळ रोजगाराची संधी मिळणार नाही तर त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्याचा मार्गही खुला झाला आहे. या दुकानाच्या माध्यमातून समाजातील या घटकाचा आत्मसन्मान वाढविण्यास हातभार लागेल, अशी भावना मैत्री संघटनेच्या सदस्यांनी व्यक्त केली.

तृतीयपंथांसाठी रेशन दुकान फक्त रोजगाराचे साधन नाही, तर त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात समावेशाचे प्रतीक आहे. शासनाने घेतलेले हे पाऊल ऐतिहासिक असून समाजातील बदलाचा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

