लेकीच्या लग्नाच्या पाच दिवस आधीच मुलीच्या वडिलांचे निधन, कुंजीरवाडीसह परिसरात हळहळ, मुलीवर आली बापाचे अत्यंसंस्कार करण्याची वेळ…

लोणी काळभोर : मुलीचे अवघ्या पाच दिवसांवर लग्न येऊन ठेपलेल्या आळंदी म्हातोबा येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. मागील अनेक दिवसांपासून ते आळंदी म्हातोबा (ता. हवेली) येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक या पदावर कार्यरत होते.
त्याचे आज शनिवारी (ता. ०३) दुर्दैवी निधन झाले आहे. घरात लग्नाचे मंगलमय वातावरण असताना अचानक घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने कुटुंबीयांसह संपूर्ण कुंजीरवाडी गावावर शोककळा पसरली आहे.
हवेली पंचायत समितीचे आदर्श शिक्षक भाऊसाहेब जिभाऊ सोनवणे (वय -५५. रा. कुंजीरवाडी, ता. हवेली) असे मयत शिक्षकाचे नाव आहे. मागील अनेक दिवसांपासून ते आळंदी म्हातोबा (ता. हवेली) येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक या पदावर कार्यरत होते.
सासरी जाण्यापूर्वीच बापाचे अंत्यदर्शन घेण्याची वेळ मुलीवर आली. भाऊसाहेब सोनवणे यांची मुलगी अर्पिता हिचे लग्न ९ मे २०२५ रोजी नाशिक जिल्ह्यातील मुलाशी निश्चित झाले होते. मागील काही दिवसांपासून लग्नाच्या तयारीसाठी ते धावपळ करत होते.
मात्र आज शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले आणि त्यांचा रक्तदाबही कमी झाला. ते चक्कर येऊन घरीच पडले. तातडीने त्यांना लोणी काळभोर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारांपूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगीतले.
दरम्यान, ही बातमी कळताच कुटुंबीय, नातेवाईक आणि गावकऱ्यांवर शोककळा पसरली. आनंदाने गजबजलेले घर अचानक शोकमय झाले. लग्नाच्या तयारीचा सगळा उत्साह एका क्षणात ओसरला. भाऊसाहेब सोनवणे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातू असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने परीसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.