पुणे हादरले! धुलिवंदनाच्या दिवशी कोयता घेऊन धमकी, मग गोळीबार…!

पुणे : पुण्यातील मार्केट यार्ड येथील आंबेडकरनगरमध्ये भर दुपारी एकावर गोळीबार करण्यात आला. यात एक जण जखमी झाल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गोळीबार करून पसार झालेल्या आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
गोळीबारात गवळी नावाच्या व्यक्तीच्या हाताला गोळी लागली आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे. याबाबत स्थनिक नागरिकांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फोन करून तक्रार दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली.
आंबेडकरनगर वसाहतीत मंगळवारी जुन्या वादातून सूड घेण्यासाठी प्रशांत उर्फ पऱ्या गवळी हा दुपारच्या सुमारास संतोष कांबळेला मारण्यासाठी कोयता घेऊन आला होता. त्याला प्रतिकार करत संतोष कांबळेने प्रशांत गवळी याच्यावर बंदुकीतून तीन राउंड फायर केले.
यात प्रशांत गवळी जखमी झाला. या प्रकरणी संतोष वामन कांबळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे. प्रशांत उर्फ पऱ्या गवळी याला गोळी लागली असून प्रशांतही सराईत गुन्हेगार आहे.