अखेर सत्य बाहेर आलंच, साताऱ्यातील डॉक्टरचा PSI सोबत काय वाद होता? खळबळजनक माहिती आली समोर…

सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात नोकरीवर असणाऱ्या महिला डॉक्टरने एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी तिने तळहातावर पीएसआय गोपाळ बदने आणि पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

तसेच या प्रकरणी प्रशांत बनकर याला अटक झाली असून, पोलीस निरीक्षक गोपाळ बदने फरार आहे. आता या प्रकरणातील वादाचे मूळ समोर येत असून, एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

या आत्महत्या प्रकरणाच्या तपासाबाबत पोलीस अधिकारी तुषार दोशी यांनी एका वृत्तवाहिनीला माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मृत महिला डॉक्टर आणि फलटण ग्रामीण पोलिसांमध्ये वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्रावरून अनेकदा वाद झाले होते.

पोलिसांनी आरोपींना दिलेला वैद्यकीय अहवाल हवा तसा मिळत नसल्याने डॉक्टरला त्रास दिला जात असल्याचा आरोप होता. या संदर्भात डॉक्टरने पोलिसांविरोधात तक्रारही केली होती.
दरम्यान, या तक्रारीनंतर पोलीस प्रशासनाने चौकशी करून पोलिसांना सहकार्य करण्याचे आदेश दिले होते, असेही दोशी यांनी स्पष्ट केले. मात्र, हा वाद मिटण्याऐवजी वाढतच गेल्याचे आणि त्याचे पर्यवसान आत्महत्येत झाल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी जिल्हा आरोग्य विभागाकडे डॉक्टर विरोधात तक्रार केल्याने चौकशी समितीही नेमण्यात आली होती, जिथे डॉक्टरने आपली लेखी बाजू मांडली होती.
