अखेर ठाकरे बंधू एकत्र! ५ जुलैच्या मराठी मोर्चात बंधूभेट, संजय राऊतांची घोषणा..

मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. हिंदी सक्तीविरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे आंदोलनाच्या मैदानात उतरले आहेत. संजय राऊत यांनी एकच मोर्चा निघणार असल्याचे जाहीर केल्यानंतर उद्धव-राज हे एकत्र येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
हिंदीसक्तीविरोधात ठाकरे बंधूंचे दोन वेगवेगळे मोर्चे काढण्याऐवजी एकत्रित एकच मोर्चा काढावा, यासाठी प्रयत्न सुरु होते. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही एक मो यासाठी हालचाली सुरु होत्या. यानंतर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे.
महाराष्ट्रतील शाळात हिंदीसक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल, अशी एक्स पोस्ट संजय राऊत यांनी केली आहे. त्यामुळे हिंदीसक्तीविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याचं निश्चित झालं आहे.
संजय राऊत यांनी मुंबईत आज माध्यमांसोबत बोलताना सांगितले की, गुरुवारी मराठी अभ्यास केंद्राच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या त्रिभाषा सूत्र विरोधी समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद पार पडली.
या पत्रकार परिषदेत ७ जुलैचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्याच दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये त्यांनी ६ जुलैचा मोर्चा जाहीर केला. आम्ही मातोश्रीच्या पत्रकार परिषदेत असल्याने त्याची कल्पना नव्हती.
मातोश्रीवरील पत्रकार परिषद संपल्यानंतर राज ठाकरेंचा फोन आला असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. त्यांनी मोर्चाबाबत कल्पना दिली. त्यावर मी त्यांना ७ जुलैच्या मोर्चाची कल्पना दिली. मराठीसाठी एकच मोर्चा असावा अशी भूमिका मांडली.
त्यानंतर राज ठाकरे यांचा निरोप घेऊन उद्धव यांच्यासोबत चर्चा केली. त्यावर उद्धव यांनी काही सूचना केली.६ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. त्यामुळे मोर्चावर परिणाम झाला असता. त्यामुळे मोर्चाची तारीख बदलावी अथवा ७ जुलैच्या मोर्चात राज यांनी सहभागी व्हावे, अशी सूचना उद्धव यांनी केली.