अखेर भाजपचे पुणे शहराध्यक्ष ठरले! ‘या’ नेत्याची लागली वर्णी…

पुणे : भाजपचे पुणे शहराध्यक्ष बदलणार आहे, अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती. अखेर आज सकाळी प्रदेश कार्यालयाकडून शहराध्यक्ष पदी माजी सभागृह नेते धीरज घाटे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आल्याची माहिती आहे.

तसेच माजी आमदार जगदीश मुळीक यांची शहराध्यक्षपदाची मुदत उलटून जवळपास एक वर्ष होऊन गेलेला आहे. त्यामुळे नवीन शहराध्यक्ष कोण याची चर्चा शहरात गेल्या काही महिन्यापासून सुरू होती.
यामध्ये स्वतः जगदीश मुळीक माजी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी सभागृह नेते गणेश बिडकर, धीरज घाटे, श्रीनाथ भिमाले यांच्यासह इतर काही जण इच्छुक होते.

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये धीरज घाटे हे देखील इच्छुक होते. त्यांनी उमेदवारी मिळवण्याचा जोरदार प्रयत्न केलेला होता. मात्र पक्षाकडून त्यांच्या नावाचा विचार करण्यात आलेला नव्हता.
त्यांना पक्षाच्या नेत्यांकडून शहराध्यक्ष पदाचे आश्वासन दिले असल्याचे सांगण्यात येत होते. कसब्याच्या निवडणूकीनंतर संघटनेत मोठ्या प्रमाणात फेरबदल केले जातील अशी संकेत पक्षाचे नेतृत्वाने दिलेले होते. पण राज्यात घडत असलेल्या अनपेक्षित घडामोडींमुळे भाजपकडून शहराध्यक्ष पदाची घोषणा केली जात नव्हती.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ३० जून या दिवशी महाराष्ट्रातील सर्व नवे जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष जाहीर केले जातील असे सांगितले होते. मात्र ही मुदत देखील उलटून गेली.
अखेर आज सकाळी प्रदेश कार्यालयाकडून राज्यातील नवे जिल्हाध्यक्ष आणि शहर देशांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये पुणे शहराची जबाबदारी घाटे यांच्याकडे देण्यात आली आहे.
दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून धीरज घाटे यांचे नाव शहराध्यक्ष पदासाठी चर्चेत होते आणि कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याकडून ही देखील घाटे यांचे नाव अंतिम झाल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे आज घाटे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.