पुण्यातील कल्याणी नगरच्या आयटी कंपनीला भीषण आग ; आगीत 30 जण अडकले

पुणे : शहरातील वडगाव शेरीतील कल्याणीनगर परिसरातील आयटी पार्कच्या पाचव्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग आज सकाळी साडे आकरा वाजण्याच्या सुमारास लागली आहे. टेरेसवर जवळपास ३० लोक अडकले आहेत. त्यांची सुटका करण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
आग लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आणि जीव वाचवण्यासाठी अनेकांनी गच्चीवर धाव घेतली. इमारतीत गच्चीवर अडकलेल्या 4 नागरिकांची सुटका झाली आहे. तर अजून काही नागरिक व कर्मचारी इमारतीत अडकल्याची शक्यता आहे.
दरम्यान काल मध्यराञी अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मार्केटयार्ड, गोल मार्केट येथील एका गोडाऊनमधे आग लागल्याची माहिती मिळाली. त्याचवेळी अग्निशमन वाहन घटनास्थळी दाखल झाले.
गोडाऊनमधे कागद रद्दी व काही प्रमाणात पुठ्ठा असणाऱ्या मालाला मोठ्या प्रमाणात आग लागली आहे. जवानांनी तातडीने गोडाऊनचा मुख्य दरवाजाचे बोल्ड कटरच्या साह्याने कुलुप तोडत चोहोबाजूंनी पाण्याचा मारा सुरू करून आतमधे कोणी कामगार अथवा नागरिक अडकला नाही ना याची ही खाञी केली. आग मोठी असल्याने जवानांनी अग्निशमन वाहनांना पाचारण केले.