पंतप्रधान बी कुसुम योजनेतून शेतकऱ्यांना मिळणार सौर कृषी पंप! ९० ते ९५ टक्के अनुदानावर इतके पंप उपलब्ध…

पुणे : शेतकऱ्यांना कृषी वापरासाठी पारेषण विरहित सौर कृषी पंप अनुदान तत्वावर उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान कुसुम-बी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत ३ एचपी, ५ एचपी व ७.५ एचपी क्षमतेचे सौर कृषी पंप शेतकऱ्यांना ९० ते ९५ टक्के अनुदानावर उपलब्ध करून दिले जाणार आहेत, अशी माहिती महाऊर्जा पुणे विभागीय महाव्यवस्थापक हेमंत कुलकर्णी यांनी दिली.

सौर कृषी पंपासाठी पात्र लाभार्थ्यांना पंपाच्या क्षमतेनुसार खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना १० टक्के तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना ५ टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागणार आहे. यासंदर्भात पात्र शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी एसएमएस पाठविला जातो.

महाऊर्जामार्फत आतापर्यंत पुणे जिल्ह्यात सुमारे ८,२०५ सौर कृषी पंपांची स्थापना करण्यात आली आहे. नवीन अर्ज नोंदणी करण्यासाठी https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B तसेच https://kusum.mahaurja.com/beneficiary/ या संकेतस्थळावर अर्ज करता येईल. ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून अर्ज नोंदणीपासून कागदपत्रे अपलोड करणे, अर्ज छाननी, लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी एसएमएस पाठविणे, ऑनलाईन हिस्सा भरणे व पुरवठादार निवडणे या सर्व सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी महाऊर्जा मार्फत खोटे एसएमएस प्राप्त झाल्यास अशा संदेशांपासून सावध राहावे आणि फसवणुकीपासून बचाव करावा, असेही आवाहन श्री. कुलकर्णी यांनी केले आहे.
