शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे!! सुप्रिया सुळे यांचा बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा….

पुणे : प्रहार जनशक्ती या पक्षाचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे समाधीस्थळ गुरुकुंज आश्रम, मोझरी येथे शेतकरी, कष्टकरी, दिव्यांग, तरुण, निराधार आदींच्या न्याय्य हक्कांसाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून ते मांडत असणारे विविध प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत. शासनाने ते प्राधान्याने सोडविलेच पाहिजेत अशी आमची भूमिका आहे.

या आंदोलनाला शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पाठिंबा दिला आहे. त्या म्हणाल्या, बच्चूभाऊंनी आंदोलनाच्या दरम्यान उपस्थित केलेल्या मागण्यांबाबत आम्ही सर्वांनी विविध माध्यमांतून सातत्याने आवाज उठविला आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे तथा त्यांच्या उत्पादनांना योग्य तो बाजारभाव मिळाला पाहिजे.
जेणेकरुन ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था रुळावर येईल अशी आमची भूमिका आहे. यासोबतच महिला, दिव्यांग, बेघर आणि निराधार आदी वंचित समाजघटकांचे त्यांनी मांडलेले मुद्दे देखील योग्य असून त्याला आमचा पाठिंबा आहेच, असेही सुळे यांनी म्हटले आहे.

बच्चूभाऊंनी उपस्थित केलेल्या मुद्यांशी आम्ही सहमत असून त्यासाठी पुकारलेल्या आंदोलनास मी पाठिंबा जाहिर करते. बच्चूभाऊ हे सार्वजनिक आयुष्यात वावरणारे एक जबाबदार नेते आहेत. म्हणूनच राज्याच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझी नम्र विनंती आहे की, कृपया आपण त्यांनी मांडलेल्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक विचार करावा.
