खंडणी, धमक्या आणि पॉक्सोचा धाक; पुण्यातील गाजलेल्या प्रकरणात नवी घडामोड, महिला पोलिसाला कोर्टाचा दणका


पुणे : पुणे शहरात मोठी खळबळ उडवून देणाऱ्या प्राचार्य ब्लॅकमेलिंग आणि खंडणी प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. एका नामांकित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना पॉक्सो गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन लाखोंची खंडणी उकळल्याप्रकरणी आरोपी असलेल्या महिला पोलीस कर्मचारी सोनाली हिंगे यांना न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

या प्रकरणात सोनाली हिंगे (महिला पोलीस शिपाई), अजित बडे (पोलीस उपनिरीक्षक) आणि सुदाम तायडे (पोलीस शिपाई) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी अजित बडे आणि सुदाम तायडे यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. तर सोनाली हिंगे यांनी अटक टाळण्यासाठी न्यायालयात धाव घेत जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.

मात्र सुनावणीदरम्यान न्यायालयाने काही गंभीर निरीक्षणे नोंदवली. संबंधित महाविद्यालय हे तिच्या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात नसतानाही सोनाली हिंगे यांनी तेथे भेट दिल्याचे पुरावे तपास यंत्रणेकडे असल्याचे न्यायालयाने नमूद केले. तसेच त्या संदर्भातील आवश्यक गुन्ह्याची नोंद करण्यात आली नसल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आले. या कारणांमुळे जामीन अर्ज फेटाळण्यात आला.

हे संपूर्ण प्रकरण एप्रिल 2026 मध्ये उघडकीस आले होते. तपासानुसार, पुण्यातील एका नामांकित पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या 55 वर्षीय प्राचार्यांना लक्ष्य करण्यात आले. एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा वापर करून त्यांच्याविरोधात लैंगिक छळाची खोटी तक्रार तयार करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर पॉक्सो कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा दाखल करून अटक होईल आणि समाजात बदनामी होईल, अशी भीती दाखवून प्राचार्यांकडून तब्बल 7 लाख रुपये उकळण्यात आल्याचे समोर आले.

काही दिवसांनी हा संपूर्ण प्रकार संशयास्पद वाटू लागल्यानंतर संबंधित प्राचार्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. दरम्यान, या प्रकरणातील अल्पवयीन विद्यार्थिनीनेही आपल्या पालकांना खरी माहिती दिल्यानंतर संपूर्ण कट उघडकीस आला. या प्रकरणाच्या तपासानंतर तीनही पोलिस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने सोनाली हिंगे यांच्या अटकेची शक्यता वाढली असून या प्रकरणाच्या तपासाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!