होऊ दे खर्च! झेडपी, पंचायत समिती निवडणुकांसाठी खर्चमर्यादा जाहीर, उमेदवार किती खर्च करू शकणार?, जाणून घ्या…


पुणे : राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाकडून घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार, राज्यात 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून 7 फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होईल. त्यामुळे, गेल्या काही महिन्यांपासून तयारीत असलेल्या उमेदवारांकडून आता निवडणुकांसाठी कागदपत्रे जमवाजमवी आणि उमेदवारी मिळवण्यासाठी शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी निवडणुकांची घोषणा करताच आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली. तसेच, उमेदवारांसाठी अर्ज भरण्याचा निवडणूक कार्यक्रमही जाहीर करण्यात आला आहे

.निवडणुकीची घोषणा होताच आदर्श आचारसंहिता लागू झाली असून उमेदवारांची लगबग सुरू झाली आहे. प्रचार, सभा, बॅनर, पोस्टर, वाहन वापर यासाठी किती खर्च करता येणार, याबाबत आयोगाने स्पष्ट नियम ठरवले आहेत आता, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांना खर्चाची मर्यादा किती असेल हेही आयोगाने स्पष्ट केलं आहे.

ज्या जिल्हा परिषदांमध्ये 71 ते 75 निवडणूक विभाग आहेत, त्या ठिकाणी जिल्हा परिषद उमेदवाराला जास्तीत जास्त 9 लाख रुपयांपर्यंत खर्च करता येणार आहे. अशा जिल्ह्यांतील पंचायत समिती उमेदवारांसाठी ही मर्यादा 6 लाख रुपये असेल.

61 ते 70 निवडणूक विभाग असलेल्या जिल्हा परिषदांमध्ये झेडपी उमेदवारासाठी 7 लाख 50 हजार रुपये, तर पंचायत समिती उमेदवारासाठी 5 लाख 25 हजार रुपयांची मर्यादा ठरवण्यात आली आहे.

50 ते 60 निवडणूक विभाग असलेल्या जिल्हा परिषदांमध्ये झेडपी उमेदवार 6 लाख रुपयांपर्यंत खर्च करू शकणार असून पंचायत समिती उमेदवारांसाठी 4 लाख 50 हजार रुपयांची मर्यादा असेल. थोडक्यात सांगायचं झालं तर जिल्हा परिषद उमेदवारांसाठी खर्चमर्यादा 6 लाख ते 9 लाख रुपये इतकी आहे, तर पंचायत समिती उमेदवारांसाठी ही मर्यादा 4.5 लाख ते 6 लाख रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे.

राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून संबंधित जिल्ह्यांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया 16 जानेवारीपासून सुरू होणार असून 21 जानेवारीपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी खर्चमर्यादेचे नियम लक्षात ठेवूनच प्रचाराची आखणी करावी, असे आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!