Ethanol : इथेनॉल मध्ये अडकलेले ११०० कोटी रुपये मिळणार, कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार….
Ethanol : केंद्र सरकारने उसाच्या ज्यूस, सिरप तसेच बी हेवी मोलॅसिसपासूनचे इथेनॉल खरेदी करण्यासाठी सकारात्मक पावले उचलली आहेत. त्यामुळे ऑईल कंपन्यांनी सुमारे ७० कोटी लिटर इथेनॉल विकत घेण्यासाठी १६ मे रोजी निविदा प्रसिद्ध केली आहे.
त्यामुळे महाराष्ट्रातील पडून असलेल्या सुमारे अकराशे कोटी रुपयांच्या शिल्लक साठ्याच्या खरेदीचा मार्ग मोकळा झाल्याने साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळाल्याची माहिती राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ यांनी दिली आहे.
केंद्र सरकारच्या अन्न आणि सार्वजनिक मंत्रालयाने उसाचा रस, ज्यूस आणि बी हेवी मोलॅसिसच्या माध्यमातून तयार होणारे इथेनॉल खरेदीला दिनांक ७ डिसेंबर २०२३ रोजी प्रतिबंधित केले होते.
या निर्णयामुळे राज्यातील साखर कारखान्यांकडे सुमारे ११०० कोटींचे साठे तसेच भारतातील सर्व साखर कारखान्यांकडे मिळून सुमारे २५०० ते ३००० हजार कोटी रुपयांचे इथेनॉलचे साठे विनाकारण पडून राहिले होते. Ethanol
या बाबत महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखान्याने दिनांक ८ डिसेंबर २०२३ रोजी आणि त्यानंतर ६ जानेवारी २०२४ रोजीच्या पत्रान्वये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदन पाठविले होते. त्यामध्ये केंद्र सरकारने निर्णय बदलून कारखान्यांकडील शिल्लक साठे ऑईल कंपन्यांना खरेदी करण्यास सूचित करण्याची मागणी केली होती.
त्यावर केंद्राने देशातील सर्व साखर कारखान्यांचे ऊसगाळप पूर्ण होऊन कारखाने बंद झाल्यानंतर पडून असलेल्या साठे विकत घेण्याबाबत विचार होऊ शकेल, असे स्पष्ट केले होते. केंद्र सरकारने त्याप्रमाणे आता देशातील सर्व साखर कारखान्यांचे गाळप पूर्ण होऊन बंद झाले आहेत.
त्यानुसार उसाचा ज्यूस, सिरप तसेच बी हेवी मोलॅसिसचे साठे पडून होते. ते घेण्याचे आदेश ऑईल मार्केटिंग कंपन्यांना दिले आहेत. त्यातून ऑईल कंपन्यांनी यातून तयार झालेले इथेनॉल विकत घेण्यासाठी १६ मे रोजी निविदा प्रसिद्ध केल्याने कारखान्यांमधून समाधान व्यक्त होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.