‘सर्वधर्म समभाव म्हणजे नपुसंकपणा’, संभाजी भिडेंचे पुन्हा वादग्रस्त विधान…

नाशिक : सर्वधर्म समभाव म्हणजे नीचपणा आहे. हा प्रकार म्हणजे ना धड स्त्री, ना धड पुरुष म्हणजे नपुंसकपणा आहे, असे वक्तव्य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे सर्वेसर्वा संभाजी भिडे यांनी केले आहे.
नाशिकमधील एका कार्यक्रमात त्यांनी “सर्वधर्म समभाव म्हणजे नपुसंकपणा” असे विधान करत लोकशाही संकल्पनेवरच सवाल उपस्थित केला. यासोबतच त्यांनी लाल किल्ल्यावर भगवा झेंडा फडकवण्याचा आवाज पुन्हा एकदा बुलंद केला.
सर्वधर्म समभाव म्हणजे ना धड स्त्री, ना धड पुरुष – म्हणजे नपुसंकपणा, असे स्पष्ट शब्दांत भिडेंनी सांगितले. त्यांच्या मते, भगवा ध्वज हा भारताच्या संस्कृतीचा प्राचीन प्रतीक असून तोच खरा राष्ट्रध्वज असायला हवा. १५ ऑगस्टला आपण तिरंगा फडकवतोच, पण भगवा फडकवण्यासाठीही प्रयत्न करायला हवेत, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली.
याआधी वादात सापडलेल्या “आंबा खाऊन मुलं होतात” या विधानावरही भिडे ठाम राहिले. “मी एक आंब्याचं झाड लावलं आहे. तिथे आंबे खाऊन पाहा,” असं म्हणत त्यांनी यावरून सुरु असलेल्या खटल्याचाही उल्लेख केला. या विधानाला माध्यमांनी दिलेल्या प्रसिद्धीवरही त्यांनी संताप व्यक्त केला.
तसेच भिडे यांनी कार्यक्रमात “ग्रहणाच्या वेळी मंत्रजप केल्यास जन्मोजन्मी त्याची शक्ती मिळते” असे अध्यात्मिक विधान करत गायत्री मंत्र व शिवाजी महाराजांचा तपश्चर्येचा दाखला दिला. या वक्तव्यात त्यांनी धार्मिक आणि ऐतिहासिक संदर्भ एकत्र गुंफले.