‘माझी मुलगी दोषी असेल तर फाशी द्या, पण आम्हाला का शिक्षा?’; केतन अग्रवाल हत्याकांडात सिया गोयलच्या वडिलांचा भावनिक सवाल

पुणे : पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांडाला एक महिना पूर्ण झाला असून, या प्रकरणातील आरोपी सिया गोयल हिचे वडील प्रवीण गोयल यांनी प्रथमच माध्यमांसमोर येत आपली बाजू मांडली आहे. “माझी मुलगी दोषी असेल तर तिला फाशी द्या, पण तिच्या चुकीची शिक्षा माझा मुलगा, पत्नी आणि आम्हाला का दिली जात आहे?” असा भावनिक सवाल त्यांनी केला आहे.

केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांना न्यायालयाने पुन्हा १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, सिया गोयलचे वडील प्रवीण गोयल यांच्या मार्केट यार्ड येथील दुकानावर अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईनंतर गोयल कुटुंब चर्चेत आले आहे.
IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली FDA च्या पुणे झोन-१ पथकाने १४ जुलै रोजी मार्केट यार्ड परिसरातील बीजी गोयल अँड कंपनी या दुकानाची तपासणी केली. या कारवाईत तब्बल ४ हजार १७२ किलो खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले असून, त्याची किंमत जवळपास ८ लाख १४ हजार रुपये असल्याची माहिती आहे.

FDA अधिकाऱ्यांनी हळद पावडर, तीळ, सोया मिनी चंक्स यांसह काही खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. विना परवाना गोदामात माल साठवणे, लेबलिंग नियमांचे उल्लंघन आणि खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत शंका आल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे FDA कडून सांगण्यात आले आहे.

मात्र, या कारवाईचा केतन अग्रवाल हत्याकांडाशी कोणताही संबंध नसल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ही नियमित तपासणीअंतर्गत करण्यात आलेली कारवाई असल्याचेही विभागाने सांगितले.
प्रवीण गोयल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “मी कायदा आणि न्यायालयाचा पूर्ण सन्मान करतो. माझी मुलगी दोषी असेल तर तिला कठोर शिक्षा द्या. पण माझा मुलगा साहिल, माझी पत्नी आणि मला या सगळ्या परिस्थितीचा त्रास का सहन करावा लागत आहे?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, केतन अग्रवाल यांच्या कुटुंबीयांनीही मुलाला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. लग्न करायचे नव्हते तर ते आधी सांगायला हवे होते, एका तरुणाचा जीव का घेतला, असा सवाल केतनच्या कुटुंबीयांनी केला होता. या प्रकरणाचा तपास सुरू असून न्यायालयीन प्रक्रियेनंतरच संपूर्ण सत्य समोर येणार आहे.