Electricity : राज्यातील अनेक वीज निर्मिती संच बंद, नेमकं कारण काय? विजेच्या समस्येमुळे नागरिक हैराण…

Electricity : राज्यातील अनेक भागात मान्सूनच्या पाऊस जोरदार सुरु आहे. त्यामुळे विजेच्या मागणीत मोठी घट होऊन महानिर्मितीसह खासगी कंपनीच्या काही संचातील वीजनिर्मिती थांबवली गेली आहे. तर काही संचातून क्षमतेहून कमी वीजनिर्मिती केली जात आहे.
उन्हाळ्यात राज्यातील विजेची मागणी २९ ते ३० हजार मेगावाॅटपर्यंत गेली होती. परंतु, राज्यातील बऱ्याच भागात मान्सूनचा पाऊस सुरू झाल्यावर बुधवारी (१२ जून) दुपारी २.३० वाजता ही मागणी सुमारे सात हजार मेगावाॅटने घसरून २२ हजार ३७१ मेगावाॅटवर आली आहे.
त्यामुळे राज्यातील भार प्रेषण केंद्राकडून महानिर्मितीसह खासगी कंपनींच्या महागड्या संचातील वीजनिर्मिती थांबवली गेली आहे. बुधवारी महानिर्मिती आणि खासगी कंपन्यांतील काही केंद्रातील वीज निर्मिती निम्म्याने कमी केली गेली, तर काही केंद्रातील संच कमी क्षमतेने चावले जात आहे. Electricity
नाशिकमधील महानिर्मितीच्या २५० मेगावाॅटच्या चार संचातील वीजनिर्मिती थांबवली गेली. येथे एकाच संचातून २३७ मेगावाॅट निर्मिती सुरू आहे. परळीतील २५० मेगावाॅटच्या तीन संचातून वीजनिर्मिती थांबवली गेली. कोराडी केंद्रातून १ हजार ४७० मेगावाॅटहून कमी वीजनिर्मिती केली जात आहे.
येथे सहसा १,९०० मेगावाॅटच्या जवळपास वीजनिर्मिती केली जाते. खापरखेडा, पारस, भुसावळमधीलही वीजनिर्मिती कमी केली गेली. अदानीकडूनही रोज सुमारे ३ हजार मेगावाॅटच्या दरम्यान वीजनिर्मिती केली जात होती. ही निर्मितीही १ हजार ४५५ मेगावाॅट अशी खाली आणली गेली आहे.
महावितरणची विजेची मागणी घटली असली तरी मुंबईत मात्र विजेची मागणी ३ हजार ६७५ मेगावाॅट नोंदवली गेली, हे विशेष. मागणी घटल्याने महानिर्मितीला वीजनिर्मिती घटवावी लागल्याच्या वृत्ताला महानिर्मितीच्या जनसंपर्क विभागानेही दुजोरा दिला आहे. अचानक मागणी वाढल्यास ग्राहकांना अखंडित वीजपुरवठ्यासाठी वेळीच वीजनिर्मितीसाठी महानिर्मिती सक्षम असल्याचाही दावा त्यांनी केला.