एकनाथ शिंदेंच्या शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुखाला अटक; भंगार व्यावसायिकाकडून 2 लाखांची खंडणी, नकार मिळताच बेदम मारहाण

नवी मुंबई : नवी मुंबईतील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. भंगार व्यावसायिकाकडून 2 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी शिवसेना (शिंदे गट) महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख पूजा बनसोडे यांना तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात त्यांच्या चार साथीदारांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचे नवी मुंबईतील इंदिरानगर परिसरात भंगाराचे दुकान आहे. दुकान सुरू ठेवायचे असेल तर 2 लाख रुपये द्यावे लागतील, अशी धमकी पूजा बनसोडे यांनी दिल्याचा आरोप आहे. मात्र, व्यावसायिकाने खंडणी देण्यास नकार दिल्यानंतर वाद चिघळला.
तक्रारीनुसार, पूजा बनसोडे यांनी सहकारी रमजान शेख, सरिता सरवदे, नरेंद्र साकवार आणि हुसेन शेख यांच्यासह दुकानात जाऊन व्यावसायिक आणि तेथील एका कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच अश्लील शिवीगाळ आणि धमक्याही दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या घटनेनंतर पीडित व्यावसायिकाने तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून मुख्य आरोपी पूजा बनसोडे यांना अटक केली. या प्रकरणातील इतर चार आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

सत्ताधारी पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यालाच खंडणी प्रकरणात अटक झाल्याने नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.