अंड्यांच्या दरांनी फोडला विक्रमी टप्पा! मुंबई-पुण्यात डझनाचा भाव शंभरीच्या उंबरठ्यावर; उन्हाळा, खाद्य महागाई आणि पुरवठा संकटाचा तिहेरी फटका

पुणे : इंधन, भाजीपाला आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीनंतर आता अंड्यांच्याही दरांनी विक्रमी पातळी गाठली आहे. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये अंड्यांचा पुरवठा कमी झाल्याने किरकोळ बाजारात दर झपाट्याने वाढले असून, मुंबई आणि पुण्यात एका अंड्याची किंमत ८ ते १० रुपयांदरम्यान पोहोचली आहे. त्यामुळे ग्राहकांना डझनभर अंड्यांसाठी ९६ ते १२० रुपये खर्च करावे लागत आहेत.

यंदाच्या उन्हाळ्याने पोल्ट्री उद्योगाला मोठा फटका दिला. दीर्घकाळ राहिलेल्या उष्णतेमुळे अंडी उत्पादन करणाऱ्या कोंबड्यांपैकी सुमारे १५ टक्के कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोल्ट्री क्षेत्रातील व्यावसायिकांनी दिली आहे. त्यामुळे राज्यातील अंडी उत्पादनातही सरासरी १५ टक्क्यांची घट झाली. उत्पादन कमी आणि मागणी कायम असल्याने बाजारातील दर वाढले आहेत.
पोल्ट्री व्यावसायिकांच्या मते, अंडी उत्पादन तातडीने वाढवणे शक्य नाही. नव्याने आणलेल्या पिल्लांना अंडी देण्याच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी साधारण चार ते पाच महिने लागतात. त्यामुळे सध्याचा तुटवडा लवकर भरून निघण्याची शक्यता कमी असून, पुढील काही महिन्यांपर्यंत दर चढेच राहू शकतात.

दरवाढीमागे केवळ उत्पादनातील घटच कारणीभूत नाही. कोंबड्यांना दिल्या जाणाऱ्या खाद्याच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. मका, सोयापेंड आणि इतर खाद्यघटकांच्या वाढलेल्या दरांमुळे उत्पादन खर्च वाढला आहे. पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक मालवाहतूक आणि आयात साखळीवर परिणाम झाला असून, खाद्याचा खर्च आणखी वाढल्याचे उद्योगातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

उष्णतेचा परिणाम केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नाही. तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पंजाबसारख्या राज्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने देशभरातील अंडी उत्पादनावर दबाव निर्माण झाला आहे. त्यामुळे घाऊक बाजारातील दर वाढत असून त्याचा परिणाम किरकोळ विक्रीवरही होत आहे.
व्यापाऱ्यांच्या मते, सणासुदीचा हंगाम आणि हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर अंड्यांची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र पुरवठा पूर्ववत होण्यासाठी अजून काही महिने लागणार असल्याने ग्राहकांना वाढीव दरांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे प्रथिनांचा स्वस्त स्रोत मानले जाणारे अंडेही आता सर्वसामान्यांच्या खिशावर अतिरिक्त भार टाकू लागल्याचे चित्र दिसत आहे.