राज्य सरकारचा मोठा निर्णय! प्रत्येक पोलीस ठाण्याला मिळणार चार निरीक्षक, ६२ वर्षापूर्वीच्या नियमात बदल..
पुणे : वाढती लोकसंख्या, वाढते औद्योगीकरण व शहरीकरण यामुळे जीवमान पद्धतीत झालेला बदल, त्यानुसार गुन्ह्यांचे बदलेले स्वरूप, सोशल मीडियाचा समाजात मोठ्या प्रमाणात झालेला प्रसार, वाढता वापर, त्या माध्यमातून होणारे गुन्हे, इंटरनेटच्या माध्यमातून होणारी आर्थिक फसवणुकीचे गुन्हे यामध्ये मोठा बदल झाला आहे. याचा परिणाम पोलिसांच्या कामकाजावर होत आहे.
या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयातील हद्दीतील प्रत्येक पोलीस ठाण्यात चार निरीक्षक देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने ६२ वर्षापूर्वीच्या नियमात बदल करुन शासन आदेश शुक्रवारी (ता.२५) जारी केला आहे.
त्यानुसार पोलीस ठाण्यातील मनुष्यबळांची संख्या वाढणार आहे. ही संख्या पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्याची व जिल्हा स्तरावरील पोलीस ठाण्यात वेगळी असणार आहे.
शासन आदेशानुसार, राज्यात सध्या अस्तित्वात असलेल्या पोलीस ठाण्यांमध्ये २३ जानेवारी १९६० च्या निकषांच्या आधारे मनुष्यबळ कार्यरत आहे. परंतु आजच्या मितीला हे मनुष्यबळ कमी पडत असून याचा परिणाम पोलिसांच्या कामकाजावर होत आहे. त्यानुसार पोलीस महासंचालक कार्यालयामार्फत गृह विभागाकडे नवीन पोलीस ठाणे निर्मितीचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते.
पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक – ४, सहायक पोलीस निरीक्षक – ६, पोलीस उपनिरीक्षक – १३, सहायक पोलीस उपनिरीक्षक – १३, हेड कॉन्स्टेबल – ४४, पोलीस कॉन्स्टेबल – ८४ एकूण – १६६ असे मनुष्यबळ असणार आहे. जिल्हा स्तरावरील पोलीस ठाण्यासाठी देखील दोन पोलीस निरीक्षक असणार आहेत.
यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक व गुन्हे पोलीस निरीक्षक असतील. जिल्हा स्तरावर पोलीस ठाण्यात १४६ एवढे मनुष्यबळ असणार आहे. रजा, प्रशिक्षण,
आजारपण याकाळात गैरहजर असलेल्या मनुष्यबळासाठी १२ राखीव मनुष्यबळ गृहीत धरण्यात आले आहे.
जिल्हा पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक -२, सहायक पोलीस निरीक्षक – ३, पोलीस उपनिरीक्षक – ९, सहायक पोलीस उपनिरीक्षक – १५, हेड कॉन्स्टेबल -४२, पोलीस कॉन्स्टेबल – ७४ एकूण –१४६ असे मनुष्यबळ असणार आहे.