चालकाचा डोळा फोडला, पत्नी अन् मुलीच्या छातीवर लाथा-बुक्क्यांनी मारहाण, पुण्यातील घटनेने संताप..

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातून गुन्हेगारी विश्वातल्या अनेक बातम्या समोर येत आहेत. अशातच आता पुण्यातील मुंढवा परिसरात एक धक्कादायक घटना उघडली आहे. इथे दोन जणांनी एका कुटुंबाला जबर मारहाण केली आहे. गाडीचा हॉर्न वाजवल्यावरून या वादाला तोंड फुटलं.
यानंतर आरोपींनी चालकाला फायटर सारख्या शस्त्राने बेदम मारहाण केली. त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून संपूर्ण चेहरा रक्ताने माखला होता. एवढंच नव्हे तर भांडण सोडवण्यासाठी आलेल्या पीडित व्यक्तीच्या पत्नीला आणि मुलीला देखील आरोपींनी मारहाण केली आहे. या प्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केली आहे. शुभम गायकवाड आणि राजू गायकवाड अशी आरोपींची नावं आहेत. तर राजेश नाथोबा वाकचौरे (वय. ५० वर्षे) सुवर्णा राजेश वाकचौरे आणि संस्कृती राजेश वाकचौरे असं मारहाण झालेल्या कुटुंबाचं नाव असून ते पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात वास्तव्याला आहेत.
नेमकं काय घडलं?
तक्रारदार राजेश वाकचौरे आपल्या पत्नी सुवर्णा वाकचौरे आणि मुलगी संकृती घटनेच्या दिवशी ९ तारखेला बाहेर जात होते. दरम्यान, मुंढवा येथील सीएनजी पेट्रोल पंपाजवळ हॉर्न वाजवल्यामुळे त्यांचं आरोपींसोबत भांडण झाले.
यावेळी मुख्य आरोपी शुभम गायकवाड आणि त्याचे वडील राजू गायकवाड यांनी फायटर सारख्या हत्याराने आणि शस्त्राने राजेश यांना मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी वाकचौरे यांच्या गाडीवर मोठा दगड मारला, काच फोडली.
दरम्यान, हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही, तर आरोपींनी राजेश यांना वाचवण्यासाठी आलेली मुलगी संस्कृती आणि त्यांची पत्नी सुवर्णा यांना देखील बेदम मारहाण केली. आरोपींनी दोघींच्या छातीवर बुक्क्या आणि पोटात लाथा मारल्याचं पोलीस तक्रारीत म्हंटले आहे.