राज्यावर दुहेरी संकट, अनेक जिल्ह्यांमध्ये धोक्याची स्थिती; पुढील 24 तास महत्त्वाचे, हवामान विभागाचा इशारा…

पुणे : राज्यात उन्हाचा तडाखा वाढत असून तापमानाने पुन्हा एकदा उच्चांक गाठला आहे. विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला असून मुंबईत पुढील चार दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

भंडारा जिल्ह्यात तापमान 43 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून नागरिकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागत आहे. दुपारच्या वेळेत अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
राज्यात पुढील काही दिवसांत उष्णता अधिक तीव्र होण्याचा अंदाज असून विदर्भातील नागरिकांना विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र 2 मेनंतर विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यातील बहुतांश भागात तापमान 40 अंशांच्या वरच राहण्याचा अंदाज आहे. हवामानाबाबत समाजमाध्यमांवर पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, अशी सूचना हवामान विभागाने दिली आहे.

जळगाव जिल्ह्यातही उष्णतेचा मोठा फटका बसला असून पाचोरा, भडगाव आणि चाळीसगाव भागात तापमान 42 ते 43 अंशांपर्यंत पोहोचले आहे. दुपारच्या वेळी रस्ते ओस पडत आहेत. दरम्यान, पाचोरा येथे उष्माघातामुळे एका फळविक्रेत्या तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.