कामाशिवाय घराबाहेर पडू नये!! हवामान विभागाचं ‘या’ जिल्हातील नागरिकांना आवाहन..

मुंबई : रायगड जिल्ह्यासह मुंबई आणि कोकण पट्ट्यात पुढील ४८ तास वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १८ मेपर्यंत या भागात ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहतील. ढगांच्या गडगडाटासह सरी पडण्याची शक्यता असून, नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

गेल्या दोन दिवसांत देशभरात हवामानात मोठ्या प्रमाणावर बदल दिसून आले आहे. त्याचा प्रत्यक्ष परिणाम महाराष्ट्रात जाणवतो आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ या चक्रीवादळामुळे वाऱ्यांची दिशा बदलली आहे. त्याचा पाऊस आणि वाऱ्यांवर मोठा परिणाम झाल्याचं हवामान विभागाने सांगितले आहे.
अरबी समुद्र तसेच तेलंगणा भागात वाऱ्यांच्या चक्राकार गतीमुळे १५ ते २२ मेदरम्यान राज्यात पावसाची शक्यता अधिक आहे. सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे.

यामुळे प्रशासनाने काही सूचना जारी केल्या आहेत. वारे आणि विजा चमकत असताना घराबाहेर पडू नये, मोबाईल आणि इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर टाळावा, याच चक्रीवादळाचा परिणाम पश्चिम बंगाल, ओडिशा आणि बांगलादेशातही जोरदार पावसाच्या स्वरूपात दिसून येणार असल्याचा अंदाज आहे.

दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील ३ ते ४ आठवड्यांत सरासरीहून अधिक पावसाचं प्रमाण राहणार आहे. उन्हाळ्याच्या महिन्यात वळवाचा अनुभव महाराष्ट्रभ जाणवत असून, यंदाचा मे महिना पावसाळी ठरतो आहे. मुंबईसह अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.