मुंबईला वेठीस धरू नका! हायकोर्टाने व्यक्त केली चिंता, नेमकं सुनावणीत काय घडलं?

मुंबई : सध्या मुंबईत मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून सरसकट आरक्षण देण्यासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. सध्या मोठ्या प्रमाणावर मराठा समाज मुंबईत दाखल होत आहे. यामुळे लवकरच तोडगा काढावा अशी मागणी केली जात आहे.

मनोज जरांगे-पाटील यांनी २९ ऑगस्टपासून मुंबईत सुरू केलेल्या आंदोलनाविरोधात केलेल्या जनहित याचिकेवर आज (दि.१) दुपारी मुंबई उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी झाली. आंदोलन हाताबाहेर गेले आहे. आम्ही संयम ठेवला कारण काही तरी चांगल व्हावं, अशी आमची इच्छा होती,” असे स्पष्ट करत पावसात आंदोलन करताय तर चिखलात बसण्याची तयारी ठेवा, असेही न्यायालयाने सुनावले. तसेच या मुद्यावर उद्या दुपारी तीन वाजता सुनावणी होईल, असे स्पष्ट केले.
मराठा आंदोलनामुळे मुंबईकरांची मोठया प्रमाणात गैरसोय होत असल्याने याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी एमी फाऊंडेशनच्या वतीने दाखल केलेल्या याचिकेमध्ये करण्यात आली हाेती. याचिककर्त्यांची मागणी मान्य करत न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर तातडीची सुनावणी झाली. आंदोलन हाताबाहेर गेले आहे.

आम्ही संयम ठेवला कारण काही तरी चांगल व्हावं, अशी आमची इच्छा होती, असे स्पष्ट करत पावसात आंदोलन करताय तर चिखलात बसण्याची तयारी ठेवा, असेही न्यायालयाने सुनावले. या आंदोलनाचा मुंबईकरांना त्रास होवू नये. उद्या शाळा आणि कॉलेजवरही परिणाम होईल. आम्ही आंदोलनाच्या विरोधात नाही मात्र नियम व अटींचे पालन करा. मुंबईकरांना उगाच त्रास होत कामा नये. २६ ऑगस्टला आम्ही दिलेल्या निर्देशाचे काटेकोर पालन करा, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला.
काही नियमांचे पालन करण्याच्या शर्थीवर आंदोलनास परवानगी देण्यात आली होती. तिथं कुणीही उघड्यावर घाण करू नये, वाहतुकीस अडथळा आणू नये, पोलिसांनी अटकाव करू नये, सायंकाळी 6 नंतर आंदोलन संपवून जागा रिकामी करावी, अश्या अनेक अटीशर्ती घालूनच केवळ एका दिवसाची परवानगी दिली होती. राज्य सरकारनं या आंदोलनातील मागण्यांचा विचार करण्याकरता एक समिती तयार केलीय.
त्या समितीच्या माध्यमातून मागण्यांचा विचारही सुरू आहे. तसेच आंदोलकांशी चर्चादेखील सुरू आहे. हमीपत्र देताना अटींचे पालन केले जाईल, असे आंदोलकांकडून सांगण्यात आले होते. मुंबईत पाच हजार आंदोलकांना परवानगी देण्यात आली होती. मात्र या अटींचे उल्लंघन झाले आहे. हजारो आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत.
आंदोलकांनी सध्या मुंबईला खेळाचं मैदान बनवलंय, पोलिसांचे निर्देश पाळले जात नाहीत. संपूर्ण दक्षिण मुंबईत रास्ता रोको केला जातोय, अशी माहिती महाधिवक्त्यांनी दिली. नियमांचे उल्लंघन होत असेल तर तुम्ही नोटीस बजावू शकता.
यावेळी आंदोलनावेळी देण्यात आलेल्या हमीपत्रातील अटींचे उल्लंघनाबाबत जरांगे यांना नोटीस बजावली होती का?, आंदोलन रस्त्यावर उतरले तेव्हा तत्काळ कारवाई का केली नाही, अशी विचारणा यावेळी न्यायालयाने केली.
गणेशोत्सवात दिवसात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. आधीच बंदोबस्ताचा ताण असलेल्या पोलीसांवर सध्या प्रचंड दबाव आहे.शनिवार-रविवारच्या आंदोलनासाठी कोणतीही परवानगी दिलेली नव्हती. या प्रश्नी न्यायालयाने निर्णय द्यावा, आम्ही तत्काळ करु, असे महाधिवक्त्यांनी सांगितले.