एकनाथ शिंदेंच्या मनात पुन्हा मुख्यमंत्री होण्याची इच्छा? शिंदे गटाच्या आमदाराच्या विधानाने चर्चांना उधाण


मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा आज गोरेगाव येथे दसरा मेळावा पार पडत आहे. या मेळाव्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली असून, एकनाथ शिंदे आपल्या भाषणातून नेमकं काय बोलणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. अशातच मेळाव्यापूर्वी शिंदे गटाचे आमदार किशोर दराडे यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावं, अशी इच्छा व्यक्त करतानाच त्यांना मुख्यमंत्री करायचं की नाही, हे आमदारांच्या हातात असल्याचं दराडे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची चर्चा सुरू झाली आहे.

आमदार किशोर दराडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली. राज्यात एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, ही सर्वांचीच इच्छा असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करायचं की नाही, याचा निर्णय शेवटी आमदारांच्या हातात असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री झाल्यास राज्यातील विकासकामांना आणखी गती मिळेल, असा विश्वासही दराडे यांनी व्यक्त केला. सध्या विकासकामांना गती मिळत असली, तरी शिंदे मुख्यमंत्री झाल्यास विकासाला १०० टक्के गती मिळेल, असं ते म्हणाले. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत काय म्हणाले?
अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा चर्चेत आला आहे. या घटनेवरून विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात असताना किशोर दराडे यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत आपली भूमिका मांडली.

राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचं चित्र दिसत नसल्याचं दराडे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री काळजीपूर्वक काम करत आहेत. एखाद्या व्यक्तीची प्रवृत्ती चुकीची असू शकते; मात्र गृहविभाग अशा प्रवृत्तींना नक्कीच रोखेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बंडखोर उमेदवारांवर पक्षाची कारवाई
यावेळी किशोर दराडे यांनी विधान परिषद निवडणुकीवरही भाष्य केलं. विधान परिषद निवडणूक वगळता इतर ठिकाणी कोणतीही गडबड नसल्याचं त्यांनी म्हटलं. प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने निवडणूक लढवत असून, बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांवर संबंधित पक्षांनी निलंबनाची कारवाई केल्याची माहिती त्यांनी दिली.

लाडकी बहीण योजनेमुळे शिक्षकांच्या पगारावर परिणाम नाही?
लाडकी बहीण योजनेमुळे शिक्षकांच्या पगारावर परिणाम होत असल्याच्या चर्चांवरही दराडे यांनी प्रतिक्रिया दिली. या योजनेचा शिक्षकांच्या पगाराशी संबंध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे शिक्षकांचे पगार उशिराने होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

शिपायांकडून लिपिकांची कामं करून घेतली जात असल्याने प्रशासकीय कामांना अपेक्षित गती मिळत नसल्याचंही त्यांनी सांगितलं. शासनाच्या चुकीमुळे शिक्षकांचे पगार रखडत असल्याचा दावा चुकीचा असल्याचं दराडे म्हणाले.

शिक्षकांच्या पगारासाठी आवश्यक तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे पगार कोणीही रोखू शकत नाहीत. यापूर्वी शिक्षकांचे पगार वेळेवर होत होते आणि यापुढेही वेळेवर होतील, असं आश्वासनही किशोर दराडे यांनी दिलं.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!