अपघात ! एकनाथ शिंदेचे मंत्री संजय राठोड यांच्या कारचा रात्री अपघात ; एअर बॅग्स उडल्याने अनर्थ टळला

Sanjay Rathore : यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या गाडीला शुक्रवारी पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातात राठोड सुदैवाने सुरक्षित राहिले, कारण त्यांच्या वाहनातील एअर बॅग्स वेळेत उघडल्याने त्यांना गंभीर जखमांपासून वाचता आले. राठोड यांच्या गाडीने केळी घेऊन जाणाऱ्या पिकअप व्हॅनला मागून जोरदार धडक दिली, ज्यामुळे पिकअप पलटला. हा अपघात रात्री दोन वाजण्याच्या सुमारास दिग्रसजवळच्या कोपरा गावाजवळ झाला.

संजय राठोड यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यवतमाळ दौऱ्यासाठी तयारीच्या बैठकीनंतर रात्री उशिरा परत येताना हा अपघात झाला. धडकेची तीव्रता इतकी होती की पिकअपचा चालक जखमी झाला आहे. अपघातानंतर व्यापाऱ्याचे नुकसान टाळण्यासाठी रस्त्यावर पडलेली केळी दुसऱ्या वाहनात भरून पोहरागडला पाठवण्यात आली. जखमी चालकाला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.राठोड यांच्या गाडीचा समोरील भाग चक्काचूर झाला. या अपघातामुळे मंत्र्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांवर एक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे, परंतु सुदैवाने या घटनेत मोठा अनर्थ टळला आहे.
