राष्ट्रवादीत पुन्हा ‘इनसाईड गेम’ सुरू? अजितदादांच्या विश्वासू दिलीप वळसे पाटलांची ‘सिल्व्हर ओक’वर शरद पवारांसोबत खलबतं; भेटीमागचं कारण आलं समोर


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात पुन्हा एकदा पडद्यामागील हालचालींना वेग आल्याची चर्चा रंगू लागली आहे. एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या एकत्रीकरणाच्या चर्चांना अधूनमधून उधाण येत असतानाच, अजित पवार यांचे विश्वासू आणि ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी थेट ‘सिल्व्हर ओक’वर जाऊन शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या नजरा खिळल्या आहेत. या भेटीचा फोटो समोर आल्यानंतर राष्ट्रवादीत नेमकं काय सुरू आहे, याबाबत चर्चांचा धुरळाच उडाला आहे.

माहितीनुसार, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुंबईतील शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, सहकार क्षेत्रातील घडामोडी, विविध संस्थांचे कामकाज आणि राज्यातील काही महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

मात्र, या भेटीची वेळ आणि राजकीय पार्श्वभूमी यामुळे तिचे महत्त्व अधिक वाढले आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये संवाद वाढत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. याआधीही अजित पवार गटातील काही नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यात आता दिलीप वळसे पाटील यांची भर पडल्याने राजकीय तर्कवितर्कांना आणखी खतपाणी मिळाले आहे.

विशेष म्हणजे, पक्ष फुटीनंतरही शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील अनेक संस्थांमध्ये दिलीप वळसे पाटील सक्रिय आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, वाय. बी. चव्हाण सेंटर यांसारख्या संस्थांशी त्यांचा आजही जवळचा संबंध आहे. त्यामुळे ही भेट केवळ शिष्टाचाराची होती की त्यामागे आणखी काही राजकीय संदेश दडलेला आहे, याबाबत चर्चा रंगल्या आहेत.

दरम्यान, वळसे पाटील यांच्या कार्यालयाकडून या भेटीवर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. ही भेट पूर्णपणे सामाजिक, सहकारी आणि संस्थात्मक विषयांवर चर्चा करण्यासाठी झाली असून तिचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे प्रवक्ते उमेश पाटील यांनीदेखील या भेटीला विशेष राजकीय रंग देण्याचे कारण नसल्याचे म्हटले आहे. शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील यांच्यातील संबंध अनेक दशकांचे असून अशा भेटी यापूर्वीही होत आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

तरीही, आगामी निवडणुका, बदलती राजकीय समीकरणे आणि राष्ट्रवादीतील सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर ‘सिल्व्हर ओक’वरील ही भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे या भेटीमागे नेमकं काय आहे, याकडे आता राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!