Uruli Kanchan News : भुरटे चोर ट्रकचे डिझेलही सोडेना ! उरुळी कांचन येथे उभ्या कंटेनरमधून १६ हजारांच्या डीझेलची चोरी
उरुळी कांचन : पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत उभे असलेल्या कंटेनरमधील १६ हजार २०० रुपये किमतीचे १८० लिटर डीझेल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करीत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी कंटेनर चालक रवी कुमार भिल वय – ३८, रा. कलनगर वाल ता. मिर्जापुर जि. मिर्जापुर राज्य उत्तर प्रदेश) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी कुमार भिल हे पुणे – सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन येथील रस्त्याच्या बाजूला असलेल्या एच.पी. पेट्रोलपंप व भारत पेट्रोल पंपाच्या जवळ शनिवारी (ता. 13) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास कंटेनर उभा केला होता. सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्यांना डिझेलच्या टाकीचे झाकण उघडलेल्या अवस्थेत आढळून आले.
त्यांनी जवळ जाऊन पाहणी केले असता झाकण तुटलेल्या अवस्थेत दिसून आले. तर टाकीत असलेले १६ हजार २०० रुपये किमतीचे १८० लिटर डीझेल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे लक्षात आले.
दरम्यान, याप्रकरणी भिल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार होले करीत आहेत.