आईच बनली अल्पवयीन लेकीच्या शोषणाची सूत्रधार? ग्राहकांकडून पैसे घेत खोलीत पाठवल्याचा आरोप; पुण्यात पोलिसांच्या छाप्याने खळबळ!

पुणे : ज्या आईकडून मुलीच्या संरक्षणाची अपेक्षा असते, त्याच आईवर पैशांसाठी अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप झाला आहे. ग्राहकांकडून पैसे स्वीकारून मुलीला खोलीत पाठवले जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी नियोजनबद्ध सापळा रचत छापा टाकला. या कारवाईत अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली असून, तिच्या आईला अटक करण्यात आली आहे. पुण्यातील या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

सहकारनगरमधील सदनिकेत नेमकं काय सुरू होतं?
पुण्यातील सहकारनगर परिसरातील शकुंतला अपार्टमेंटमधील एका सदनिकेत हा प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. १२ ऑक्टोबर रोजी शकुंतला अपार्टमेंटच्या ‘बी’ इमारतीतील एका सदनिकेत अल्पवयीन मुलीकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती समोर आली. या माहितीची सत्यता तपासण्यासाठी पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या.


बनावट ग्राहक पाठवला अन् पोलिसांनी टाकला छापा
संबंधित ठिकाणी नेमका काय प्रकार सुरू आहे, याची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी प्रथम एका बनावट ग्राहकाला सदनिकेत पाठवले. प्राथमिक पडताळणीनंतर पोलिसांच्या पथकाने अचानक छापा टाकला. या कारवाईदरम्यान अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली. ग्राहकांकडून पैसे घेऊन स्वतःच्या मुलीला या व्यवसायासाठी पाठवले जात असल्याचा आरोप तिच्या आईवर आहे. या प्रकरणात पोलिसांनी महिलेला अटक केली आहे.
पोलीस पथकात कोणाचा सहभाग?
पोलीस निरीक्षक आशालता खापरे यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. पोलीस अंमलदार ईश्वर आंधळे, बबनराव केदार, अमेय रसाळ, अविनाश कोंडे आणि वैशाली खेडेकर यांच्या पथकाने छाप्यात सहभाग घेतला.
दरम्यान, या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, मुलीचे शोषण किती काळापासून सुरू होते आणि या प्रकाराशी संबंधित अन्य काही धागेदोरे आहेत का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. तपासातून पुढील बाबी स्पष्ट होणार आहेत.
