चहाच्या टपरीवर विद्यार्थ्यांच्या गप्पा ऐकल्या अन् NEET पेपरफुटीचं जाळं विणलं? साडेचार लाखांची मागणी, आईने सोनं गहाण ठेवलं!

पुणे : नीट-यूजी परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) आरोपपत्रातून एकामागून एक धक्कादायक तपशील समोर आले आहेत. पुण्यातील एका चहाच्या दुकानदाराने विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत सुरू असलेल्या चर्चेचा फायदा घेत त्यांना प्रश्नपत्रिका मिळवून देण्याचे आमिष दाखवल्याचा आरोप आहे. शेषराव बजरंग सूर्यवंशी असे या दुकानदाराचे नाव असून, त्याने प्रश्नपत्रिकेसाठी तब्बल साडेचार लाख रुपये मागितल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात एका विद्यार्थ्याच्या आईला पैसे उभे करण्यासाठी सोन्याचे दागिने गहाण ठेवावे लागल्याची माहितीही समोर आली आहे.

चहाच्या टपरीवरून सुरू झाला कथित प्रकार
सीबीआयच्या तपासानुसार, एप्रिल महिन्याच्या मध्यात पुण्यातील शिकवणी वर्गाबाहेर असलेल्या चहाच्या दुकानात नीट परीक्षेची तयारी करणारे दोन विद्यार्थी बसले होते. परीक्षेची तयारी आणि प्रश्नपत्रिकेबाबत त्यांच्यात चर्चा सुरू होती. ही चर्चा ऐकल्यानंतर दुकानमालक सूर्यवंशी त्यांच्याजवळ गेला. आपल्या मित्राकडून परीक्षेची प्रश्नपत्रिका मिळवून देता येईल, मात्र त्यासाठी साडेचार लाख रुपये द्यावे लागतील, असे त्याने सांगितल्याचा आरोप आहे.


नाशिकमधील घरात दहा विद्यार्थी, प्रश्नांचा अभ्यास
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, २८ एप्रिल रोजी या दोन्ही विद्यार्थ्यांना नाशिकमधील पंचक गावातील एका घरात नेण्यात आले. तिथे आणखी आठ विद्यार्थी उपस्थित होते. अशा प्रकारे एकूण दहा विद्यार्थ्यांना प्रश्न देण्यात आले आणि पुढील तीन ते चार दिवस त्यांचा अभ्यास केल्याचे सांगितले जाते. विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्रे आणि शैक्षणिक प्रमाणपत्रेही ताब्यात घेण्यात आली होती. पैसे मिळण्याची खात्री करण्यासाठी ही कागदपत्रे ठेवण्यात आल्याचा आरोप आहे.
नीट-यूजी परीक्षा ३ मे रोजी झाली. त्याआधी २ मे रोजी विद्यार्थ्यांना घरातून बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली; मात्र, त्यांना दिलेले प्रश्न परत करण्यास सांगण्यात आले. याचदरम्यान एका विद्यार्थ्याने गुपचूप मोबाईलमध्ये सर्व प्रश्नांची छायाचित्रे काढून ठेवल्याचे तपासात उघड झाले.
आईने सोनं गहाण ठेवलं; तीन लाख रुपये दिल्याचा आरोप
परीक्षेनंतर सूर्यवंशीने एका विद्यार्थ्याशी संपर्क साधून चहाच्या दुकानावर तीन लाख रुपये रोख आणण्यास सांगितल्याचा आरोप आहे. ही रक्कम उभी करण्यासाठी विद्यार्थ्याच्या आईने ३५.८ ग्रॅम सोन्याचे दागिने गहाण ठेवले. त्यातून मिळालेले पैसे विद्यार्थ्याने सूर्यवंशीला दिल्याची माहिती तपासात समोर आली आहे. दुसऱ्या एका विद्यार्थ्याकडेही पैशांची मागणी झाली; मात्र, त्याने पैसे दिले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
मोबाईलमधील छायाचित्राने दिला तपासाला धागा
सीबीआयने सूर्यवंशीच्या मोबाईलची तपासणी केली असता, ३० एप्रिल रोजी काढलेले एक छायाचित्र आढळले. त्यामध्ये एक मुलगी प्रश्नांची प्रत हातात धरून उभी असल्याचे दिसल्याची माहिती आहे. या छायाचित्रासह इतर पुराव्यांच्या आधारे विद्यार्थ्यांपर्यंत प्रश्न कसे पोहोचले आणि त्यांच्या राहण्याची व्यवस्था कोणी केली, याचा तपास करण्यात आला.
सूर्यवंशीला २ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. तो या प्रकरणातील १४वा अटक आरोपी असल्याचे सांगितले जाते. त्याचे नाशिकमधील करिअर सल्लागार शुभम खैरनार याच्याशी संबंध असल्याचे तपासात समोर आले असून, विद्यार्थ्यांच्या निवासव्यवस्थेतील खैरनारच्या कथित भूमिकेचीही चौकशी करण्यात आली आहे. सूर्यवंशीविरोधात सीबीआयने आरोपपत्र दाखल केले आहे. मात्र, आरोपांची सत्यता न्यायालयीन प्रक्रियेत निश्चित होणार आहे.
