Dharashiv : धक्कादायक! धाराशिवमध्ये चार दिवसाला एका महिलेवर अत्याचार, ३५ दिवसात ९ गुन्हे दाखल…

Dharashiv : राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत.
महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या घटना वाढत असतानाच आई तुळजाभवानीचा म्हणजे नारीशक्तीचा, पुरोगामी विचारांचा धाराशिव जिल्हा देखील महिला सुरक्षेच्या बाबतीत अत्यंत चिंताजनक असल्याची बाब समोर आली आहे.
जिल्ह्यात २० जुलै ते २५ ऑगस्ट या ३५ दिवसांत धाराशिव जिल्ह्यात बलात्काराचे तब्बल ९ गुन्हे दाखल झाले असून, म्हणजेच जिल्ह्यात दर चार दिवसाला एक बलात्काराची घटना घडत असल्याचे दिसून आले आहे. दोन दिवसांपूर्वी भूम येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या घटनेनंतर जिल्हा महिलांसाठी सुरक्षित आहे का, असा प्रश्न पडला आहे.
दाखल झालेल्या एकूण नऊ गुन्ह्यांपैकी तीन बलात्काराच्या घटना अल्पवयीन मुलीवर झाल्या असल्यामुळे जिल्ह्यात हा काळजीचा विषय झाला आहे. धाराशिव जिल्ह्यात एकीकडे चोरी, घरफोडी, दरोडे यासारखे गुन्हे वाढलेले आहेत तर दुसरीकडे लैंगिक अत्याचाराचे देखील गुन्हे वाढलेले आहेत. Dharashiv
त्यामुळे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एरव्ही धाराशिव सारख्या जिल्ह्यात बलात्कारासारखे गंभीर गुन्हे नियंत्रणात असतात. परंतु गेल्या काही दिवसापासून गंभीर गुन्ह्यांची संख्या वाढल्यामुळे पोलिसांचा धाक कमी झाला की काय अशी शंका येत आहे.
आठही तालुक्यात बलात्काराचे गुन्हे..
धाराशिव जिल्ह्यातील आठही तालुक्यात बलात्काराचे गुन्हे दाखल झालेले आहेत. उमरगा शहरात एका चार वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील परप्रांतीय आरोपीला तात्काळ पकडण्यात आले होते.
दुसरीकडे परंडा तालुक्यात पंचाहत्तर वर्षांच्या वयोवृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. नुकतीच भूम येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली. या गुन्ह्यातील पाचही आरोपींना पकडण्यात यश आले असले तरी या गंभीर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यात पोलिसांना अपयश येत असल्याचे दिसत आहे.