व्हिडिओ, चिठ्ठी अन् ‘अडीच कोटी’चा दावा; धंगेकर दाम्पत्य संपर्काबाहेर, पुणे पोलिसांची शोधमोहीम वेगात

पुणे : पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांच्या आत्महत्येप्रकरणी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर धंगेकर आणि त्यांची पत्नी प्रतिभा धंगेकर हे दोघेही पोलिसांच्या संपर्काबाहेर गेल्याची माहिती समोर आली आहे. संभाव्य अटकेच्या पार्श्वभूमीवर दोघांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला असून त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे. त्याआधीच पुणे पोलिसांनी धंगेकर दाम्पत्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना केली आहेत.

खलील शेख यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका इमारतीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या टोकाच्या निर्णयापूर्वी त्यांनी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. तसेच दोन चिठ्ठ्याही लिहून ठेवल्या होत्या. एक चिठ्ठी घटनास्थळी इमारतीबाहेर चिकटवण्यात आली होती, तर दुसरी त्यांच्या खिशात आढळली. या दोन्ही चिठ्ठ्यांमध्ये आणि व्हिडिओत त्यांनी काही व्यक्तींना आपल्या मृत्यूस जबाबदार धरल्याचा उल्लेख केला होता. त्यात रवींद्र धंगेकर, प्रतिभा धंगेकर, मनसेचे माजी नगरसेवक बाळा शेडगे, वर्षा शेडगे यांच्यासह अन्य व्यक्तींची नावे नमूद असल्याचे पोलिस तपासातून समोर आले.
या प्रकरणात खलील शेख यांच्या पत्नीने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर धंगेकर दाम्पत्यासह एकूण १४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी संबंधितांच्या भूमिकेची चौकशी सुरू केली असून आर्थिक व्यवहार, भागीदारी आणि पैशांच्या देवाणघेवाणीची कागदपत्रे तपासण्यास सुरुवात केली आहे.

तपासातील प्राथमिक माहितीनुसार, खलील शेख हे २०११ पासून बांधकाम क्षेत्रात लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणून कार्यरत होते. विविध प्रकल्पांवरील कामासाठी त्यांनी खासगी सावकारांकडून व्याजाने मोठी रक्कम उचलली होती. संबंधितांकडून कामाचे पैसे मिळतील, असे आश्वासन वारंवार देण्यात आले; मात्र प्रत्यक्षात देयके न मिळाल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी सुमारे अडीच कोटी रुपयांची देणी अडकून असल्याचा दावा केला आहे. याच आर्थिक तणावामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताच्या पत्नीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रत्येक आरोपीची भूमिका स्वतंत्रपणे तपासली जात आहे. उत्कर्ष असोसिएट्स या फर्ममध्ये प्रतिभा धंगेकर, बाळा शेडगे आणि इतर काही जण भागीदार असल्याची माहिती समोर आली आहे. या भागीदारीतून झालेले व्यवहार, देणी-घेणी आणि आर्थिक जबाबदाऱ्या यांचाही तपास सुरू आहे. मृताच्या पत्नीने फर्ममधील भागीदार केवळ नावालाच असून प्रत्यक्ष व्यवहार रवींद्र धंगेकर पाहत असल्याचा आरोप केला आहे. मात्र, या दाव्यांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
दरम्यान, धंगेकर दाम्पत्य सध्या अज्ञातस्थळी असल्याने त्यांच्याशी संपर्क होत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्या शोधासाठी पोलिसांची स्वतंत्र पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. अटकपूर्व जामिनाच्या सुनावणीनंतर या प्रकरणाची दिशा ठरण्याची शक्यता असून आर्थिक व्यवहार, व्हिडिओतील दावे आणि चिठ्ठ्यांतील उल्लेख यावरच तपासाचा पुढील भर राहणार आहे. त्यामुळे राज्याचे लक्ष आता न्यायालयीन प्रक्रियेसह पुणे पोलिसांच्या पुढील कारवाईकडे लागले आहे.