Dhananjay Mahadik : लाडकी योजनेबाबत ते वक्तव्य धनंजय महाडिक यांना अडकवणार! थेट गुन्हा दाखल, नेमकं घडलं काय?

Dhananjay Mahadik : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीची सर्वाधिक भिस्त ही लाडकी बहीण योजनेवर असताना त्यांचेच नेते या योजनेवरून आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतायत. यापूर्वीच्या वादग्रस्त वक्तव्यापेक्षा एक पाऊल पुढे टाकत भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.
तसेच लाडकी बहीण योजनेबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी धनंजय महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनंजय महाडिक यांच्या वक्तव्यामुळे आचारसंहितेचा भंग झाल्याची फिर्याद निवडणूक विभागाच्या भरारी पथकाकडून नोंदवण्यात आली आहे.
धनंजय महाडिक यांच्याकडून कोल्हापूरच्या सभेत त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल निवडणूक अधिकाऱ्यांनी खुलासा मागवला होता. मात्र, हा खुलासा अमान्य असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
त्यामुळे आता धनंजय महाडिक यांच्यावर निवडणुकीची आचारसंहिता मोडल्याची फिर्याद दाखल करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता यापुढे निवडणूक आयोग धनंजय महाडिक यांच्यावर कठोर कारवाई करणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. Dhananjay Mahadik
मुन्ना महाडिकांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीने राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली होती. त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. राज्यातील महिला ही गोष्ट लक्षात ठेवतील. निवडणुकीवेळी मविआला मतदान करुन लाडक्या बहिणी याचा वचपा काढतील, असे काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी म्हटले होते.
धनंजय महाडिक काय म्हणाले होते?
धनंजय महाडिक यांनी एका सभेत लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत म्हटलं होतं की, सरकारने आणलेल्या लाडक्या बहीण योजनेला महिलांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. मात्र, असे असतानाही काँग्रेस याला विरोध करत आहे. त्यामुळे या योजनेचा फायदा घेऊन ज्या महिला काँग्रेस रॅलीत सहभागी होतील त्यांचे फोटो काढा. मी त्यांची व्यवस्था करतो, असे धनंजय महाडिक यांनी म्हटलं होतं.
भाषणात केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर धनंजय महाडिक यांनी दिलगिरी व्यक्त करत महिलांची माफी मागितली, तरीही धनंजय महाडिक यांना निवडणूक विभागाने नोटीस पाठवली आहे. लाडकी बहीण योजनेबाबत केलेल्या वक्तव्याचा खुलासा करा, असे आदेश निवडणूक विभागाने दिले आहेत.