Devendra Fadnavis : पवारांच्या डोक्यात काही तरी शिजतंय, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार नसतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा..
Devendra Fadnavis : महाराष्ट्रात सध्या भाजपाप्रणित महायुतीचं सरकार अस्तित्वात आहे. जून २०२२ मध्ये शिवसेनेचा शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीने एकत्र येऊन राज्यात बहुमताचं सरकार स्थापन केलं होतं. त्यानंतर जून २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवारांचा गटही या सरकारमध्ये सहभागी झाला.
तसेच ४० आमदार असलेल्या शिवसेनेचे एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. तर १०५ आमदार असलेल्या भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत. तर ४१ आमदार असलेले राष्ट्रवादीचे अजित पवार हे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री म्हणून कामकाज पाहत आहेत.
महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण यावरून रस्सीखेच सुरू आहे. याच सर्व घडामोडींवर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे भाष्य केले आहे. शरद पवारसाहेबांच्या डोक्यात मुख्यमंत्री कोणाला करायचे हे जवळजवळ शिजत आहे असे वक्तव्य फडणवीसांनी केले आहे. Devendra Fadnavis
फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरेंकडे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पाहत नाहीत. शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांची वक्तव्ये पाहता ठाकरे हा आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नसावा, असे मला वाटते, असे म्हणत त्यांनी ठाकरेंना चिमटा काढला. तर उद्धव ठाकरेंची इच्छा होती की, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचा चेहरा समोर ठेवून आघाडीने निवडणूक लढवावी.
शरद पवारांनी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार नाहीत हे स्पष्ट केले आणि नाना पटोलेंनीही त्याची री ओढली. त्यामुळे मला असे वाटते की, पवार साहेबांच्या डोक्यात मुख्यमंत्री कोणाला करायचं, हे जवळजवळ शिजतंय.
त्यांच्या डोक्यात जे तीन-चार चेहरे असतील, त्यामध्ये उद्धव ठाकरेंचा चेहरा नाही. मी शरद पवारांच्या डोक्यात कोण नाही हे सांगू शकतो. पण त्यांच्या डोक्यात कोण आहे, हे सांगणं फार कठीण आहे असेही ते यावेळी म्हणाले आहे.