सुरक्षारक्षकांचा तगडा बंदोबस्त तरी पुणे महापालिका आयुक्तांच्या बंगल्यामधील वस्तू गायब ; प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह?

पुणे : पुणे महापालिका आयुक्तांच्या बंगल्यामध्ये चोरी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बंगल्यातून चक्क महागडी झुंबरे, शोभेच्या वस्तू, टीव्ही, एसी आणि अन्य विद्युत उपकरणे गायब झाली आहेत. याबावत महापालिकेने प्रचंड गोपनीयता पाळली असून, याबाबत तक्रार अथवा गुन्हा दाखल झालेला नाही. सुरक्षा रक्षक असूनही बंगल्यातून साहित्य गायब झाल्याने महापालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
महापालिका आयुक्तांसाठी मॉडेल कॉलनीतील चित्तरंजन वाटिकेशेजारी मोठा बंगला बांधण्यात आला आहे. या बंगल्यातून चार एसी, झुंबर, पुण्यातील ऐतिहासिक वास्तूंच्या चित्रांसह अन्य चित्रे, जुन्या काळातील पितळी व कांस्य धातूचे दिवे, दोन मोठे एलईडी टीव्ही, कॉफी मेकर, वॉकीटॉकी सेट, रिमोट बेल्स, चिमणीसह सुसज्ज किचन टॉप, वॉटर प्युरिफायर असे साहित्य घरात नसल्याचे समोर आले.दुसरीकडे नव्याने या वस्तू खरेदी करण्यासाठी २० लाख रुपयांच्या निविदांची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र बंगल्यातून साहित्य खराब झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.
महापालिकेतून निवृत्त झालेले डॉ. राजेंद्र भोसले मॉडेल कॉलनीतील चित्तरंजन वाटीके शेजारी असलेल्या मोठ्या बंगल्यात राहत होते. त्यांनी जून महिन्याच्या अखेरीस या बंगल्याचा ताबा सोडला.त्यानंतर महापालिका आयुक्त नवलकिशोर राम या बंगल्यात राहण्यासाठी येणार असल्याने त्यांना बंगला पूर्ववत करून देणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्युत विभागाकडून एसी, टीव्ही, वॉटर प्युरिफायरसह अन्य महत्त्वाच्या वस्तू तातडीने घेण्यात आल्या. वस्तूंची चोरी झाल्याने पालिकेच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.