पोलिस अधिक्षकांच्या कडक निर्देशानंतरही उरुळीकांचन मध्ये बेकायदे धंदे सुरुच! उरुळीकांचन पोलिसांची एका अड्ड्यावर कारवाई..!!

उरुळी कांचन : उरुळीकांचन (ता.हवेली ) येथील दत्तवाडी परिसरात चायनीज गाडीवर देशी -विदेशी दारु बेकायदा विक्री करणाऱ्या एकाला उरुळीकांचन पोलिसांनी मुद्देमालास ताब्यात घेऊन एकावर गुन्हा दाखल केला आहे.
लक्ष्मण सुभाष बडे (वय -२४, रा.तांबेवस्ती, बाएफ रस्ता, उरुळीकांचन ) याच्यावर दारु विक्री प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार अमोल खांडेकर यांनी तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तवाडी परिसराततील इंदिरानगर मध्ये आरोपी लक्ष्मण बडे हा चायनीज गाडी लावून बेकायदा देशी व विदेशी दारुची विक्री करत होता. त्याच्याकडे देशी व विदेशी बनावटीची बेकायदा साडेचार हजार रुपयांची दारु आढळून आली आहे. पोलिसांनी या चायनीज अड्ड्यावर छापा टाकून ही कारवाई केली आहे.
दरम्यान, जिल्हा ग्रामीण पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी अवैद्य धंद्यांवर कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत दिल्यानंतर उरुळीकांचन परिसरात रासरोसपणे अवैध धंदे सुरू असल्याचे या कारवाईवरुन स्पष्ट झाले आहे.
पोलिसांनी फक्त पोलिस अधिक्षकांच्या सूचनांवरून या अवैद्य धंद्यांवर जुजबी कारवाई करु नये, अशी मागणी नागरीक करीत आहे. दरम्यान उरुळीकांचन शहरात व परिसरात चोरी छुपे असे दारुचे गुद्दे सुरू असल्याची चर्चा ग्रामस्थांत आहे.