नऊ महिन्यांची गर्भवती, बाळाच्या गळ्याभोवती नाळ आवळली; सिझरचा सल्ला मिळूनही उपचार रखडले, आई-बाळाचा दुर्दैवी मृत्यू


छत्रपती संभाजीनगर : नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेची प्रकृती बिघडल्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्याने तिच्यासह पोटातील बाळाचाही मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पैठण तालुक्यातील विहामांडवा येथे घडली आहे. उपचाराचा खर्च करण्यास सासरच्या मंडळींनी नकार दिल्याचा आरोप असून, माहेरच्यांनी खर्चाची तयारी दर्शवूनही महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले नसल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत महिलेचे नाव स्वाती उर्फ समीक्षा विशाल निंबाळकर असे आहे. सहा सप्टेंबर रोजी प्रकृती खालावल्याने तिला खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. तपासणीदरम्यान तिच्या पोटातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याचे तसेच बाळाच्या गळ्याभोवती नाळ आवळल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. त्यामुळे गर्भातील गुंतागुंत वाढत असल्याने डॉक्टरांनी तातडीने सिझर करण्याचा सल्ला दिला होता.

मात्र, उपचारासाठी लागणारा खर्च करण्यास सासरच्या मंडळींनी नकार दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. दुसरीकडे, स्वातीच्या माहेरच्यांनी उपचाराचा संपूर्ण खर्च करण्याची तयारी दर्शवली होती. तरीही तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले नसल्याचा आरोप आहे. उपचार रखडल्याने तिची प्रकृती आणखी गंभीर होत गेली.

अखेर २५ सप्टेंबर रोजी स्वातीला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. तिच्या पोटातील नऊ महिन्यांचे बाळही दगावले. या घटनेने विहामांडवासह पैठण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

या प्रकरणी पती विशाल अनिल निंबाळकर, सासरे अनिल निंबाळकर, सासू शारदा निंबाळकर आणि नणंद ऐश्वर्या निंबाळकर यांच्याविरोधात पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वातीला सासरच्या मंडळींकडून मानसिक किंवा शारीरिक त्रास दिला जात होता का, तसेच उपचार वेळेत का झाले नाहीत, यासह संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!