उपमुख्यमंत्री पवारांची तत्परता अन् वाचले सात जणांचे प्राण; काय आहे प्रकरण?, जाणून घ्या..
बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ‘देवगिरी’वरील फोन शनिवारी (ता. ८) पहाटे दोन वाजता खणखणला. पवारांना पोलादपूरच्या घाटात येथे बारामतीतील काही युवकांचा अपघात झाल्याची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने सर्व यंत्रणा हलवली आणि सात जणांचे प्राण वाचले. दुर्दैवाने यात अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, बारामती येथील कोष्टी गल्लीमधील आठ युवक दोन वाहनांतून गोव्याला जात होते. ते शनिवारी (ता. ८) पहाटे एकच्या सुमारास पोलादपूर घाटामध्ये (जि. रायगड) पोहचले होते. त्यावेळी मागून येणाऱ्या भरधाव टँकरने या दोन्ही वाहनांना जोरदार ठोकर देत चिरडले.
या भीषण अपघातामध्ये किरकोळ दुखापती वगळता बारामतीचे सातजण बचावले. मात्र वेळीच बाहेर पडता आले नसल्याने एकाचा मृत्यू झाला. या अपघातात माळेगावमधील दत्तात्रय टेके (वय ४३) यांचा मृत्यू झाला आहे.
तसेच, पोलादपूर घाटात बारामतीच्या युवकाच्या वाहनांना मध्यरात्रीच्या सुमारास अघपात झाला. या अपघातामुळे वाहनांत अडकलेल्या युवकांना रात्रीच्यावेळी काय करावे ते सूचत नव्हते. जखमींपैकी एकाने माळेगावचे रविराज तावरे यांना संपर्क साधला.
त्यांना अपघाताची आणि तेथील स्थितीची माहिती देत मदतीची मागणी केली. पोलादपूरच्या घाटात रात्री मदत पोचविणे आव्हानात्मक होते. यानंतर तावरे यांनीही रात्री दोन वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगाल्यावर फोन केला. त्यांना अपघाताची माहिती कळविली.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पवार यांनीही झोपेतून उठत तातडीने अपघातग्रस्तांना मदत पोहचवण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले. पवार यांनी रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक आणि आरोग्य विभागाचे अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या. आदेशानुसार संबंधित यंत्रणाही घटनास्थळी दाखल झाल्या.
तातडीची मदत मिळेपर्यंत माळेगावचे टेके यांचा मृत्यू झाला होता. तर सात जण सुदैवाने बचावले होते. याबाबत माहिती पहाटेपासून संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात असलेल्या पवार यांना देण्यात आली.
तसेच किरकोळ जखमी झालेल्या व बचावलेल्या सात युवकांना पुढील वैद्यकिय उपचार देण्याकामी पवार यांनी पुन्हा संबधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. तसेच त्यांनी टेके यांचा मृतदेहाचे शवविच्छेदन वेळेत करून देण्याबाबत सांगितले.