पाऊस गायब, शेतकरी संकटात; ‘दुष्काळ जाहीर करावा ही आजची गरज, तो आपोआपच होईल’, कृषीमंत्री भरणेंचा मोठा खुलासा; ५० हजारांच्या मदतीपासून चारा छावण्यांपर्यंत काय म्हणाले?

पुणे : राज्यातील अनेक भागांत पावसाने मोठी उघडीप दिल्याने खरीप हंगाम अडचणीत आला आहे. पिकांना पावसाची गरज असताना पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली असून, राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहे. याच पार्श्वभूमीवर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दुष्काळाच्या प्रश्नावर महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. कृषी आणि महसूल विभागाकडून परिस्थितीची माहिती घेतली जाईल. ‘दुष्काळ जाहीर करावा ही आजची गरज असून तो आपोआपच जाहीर होईल,’ असे भरणे यांनी म्हटले आहे. मात्र, अंतिम निर्णयासाठी संबंधित विभागांकडून परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.
भरणे यांनी सांगितले की, राज्यातील शेतकरी सध्या अडचणीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही परिस्थितीचा आढावा घेतला आहे. आपण स्वतः पाच ते सहा जिल्ह्यांचा दौरा करून प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना शासनाकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. पावसाचा खंड अधिक वाढल्यास पशुधनावरही परिणाम होण्याची शक्यता असल्याने चारा छावण्यांबाबतही विचार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पशुधन आणि दुग्ध व्यवसायासंदर्भातील निर्णय दिवाळीच्या आसपास घेतला जाणार असल्याचेही भरणे यांनी सांगितले.

५० हजारांच्या अनुदानाचीही चर्चा


शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरही कृषीमंत्र्यांनी माहिती दिली. राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार असून, त्यासाठी अंदाजे ४० हजार ८८५ कोटी रुपये लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान देण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू होईल आणि याबाबत लवकरच शासनाकडून निर्णय होणार असल्याचे भरणे यांनी सांगितले.
महिलांना मिळणार शेतकरी प्रमाणपत्र
दरम्यान, शेतीशी संबंधित महिलांसाठीही कृषी विभागाकडून महत्त्वाची सुविधा सुरू करण्यात आली आहे. ज्या महिलांच्या नावावर शेतीचा सातबारा नाही, मात्र त्या शेती किंवा शेतीशी संबंधित व्यवसायात कार्यरत आहेत, अशा महिलांना शेतकरी प्रमाणपत्र देण्यासाठी पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या प्रमाणपत्राच्या आधारे महिलांना कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेता येणार असल्याची माहिती भरणे यांनी दिली.
लातूरमध्ये दुष्काळासाठी शेतकरी संघटनांचा रास्तारोको
दुसरीकडे, लातूरसह मराठवाड्यात पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा करत शेतकरी संघटनांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. उदगीर तालुक्यातील तिवटग्याळ पाटी येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. जवळपास तासभर चाललेल्या या आंदोलनात कोरडा दुष्काळ राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी आणि संपूर्ण कर्जमाफी करावी, अशा मागण्या करण्यात आल्या.
तसेच पीकविमा योजनेतून वगळलेल्या नुकसानीच्या बाबी पुन्हा समाविष्ट कराव्यात आणि गावनिहाय पीक कापणी प्रयोग घेण्यात यावेत, अशीही मागणी शेतकरी संघटनेने केली. लातूरमध्ये दीर्घकाळ पावसाचा खंड पडल्याने सोयाबीनसह खरीप पिकांचे नुकसान झाल्याचे विविध अहवालांत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यातील पावसाच्या खंडामुळे परिस्थितीचे गांभीर्य वाढले असून दुष्काळ जाहीर करण्याबाबतचा अंतिम निर्णय संबंधित विभागांच्या आढाव्यानंतर होणार आहे. त्यामुळे सरकारच्या पुढील निर्णयाकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.