वळणावर काळाचा घाला! गडचिरोलीत एसटी बस पलटी; चिमुकल्यासह 3 जणांचा मृत्यू, 33 प्रवासी जखमी

गडचिरोली : सकाळच्या शांततेला काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली. गडचिरोली-उमरखेड मार्गावर नवेगाव-मुरखळा परिसरात गुरुवारी सकाळी एसटी बसचा भीषण अपघात झाला. काही क्षणांतच बसमधील आनंदाचा प्रवास आरडाओरड आणि किंकाळ्यांमध्ये बदलला. वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव बस रस्त्याच्या कडेला जाऊन थेट शेतात उलटली आणि मोठा अनर्थ घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य परिवहन महामंडळाची ही बस गडचिरोलीवरून यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडकडे निघाली होती. बसमध्ये सुमारे 51 प्रवासी होते. सकाळी साधारण 7.30 वाजता बस नवेगाव-मुरखळा परिसरातील तीव्र वळणावर आली असता अचानक चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. काही क्षणातच बसने रस्त्याच्या कडेला असलेला लोखंडी कठडा तोडला आणि जोरदार धडक देत शेतात पलटी घेतली.
अपघात इतका भीषण होता की बसमध्ये प्रवासी एकमेकांवर आदळले, आरडाओरड सुरू झाली आणि मदतीसाठी आक्रोश सुरू झाला. स्थानिक नागरिकांनी आवाज ऐकताच घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले. जखमींना बसमधून बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.

या दुर्घटनेत 7 महिन्यांच्या चिमुकल्यासह 3 प्रवाशांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, तर 33 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय पथके घटनास्थळी दाखल झाली. संपूर्ण परिसरात तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. बसला क्रेनच्या मदतीने सरळ करण्याचे कामही हाती घेण्यात आले. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
प्राथमिक तपासानुसार, तीव्र वळण, भरधाव वेग आणि चालकाचे नियंत्रण सुटणे ही अपघाताची प्रमुख कारणे असू शकतात. मात्र नेमके कारण शोधण्यासाठी सखोल तपास सुरू आहे. बसची तांत्रिक तपासणीही करण्यात येणार आहे.
या दुर्घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. प्रशासनाकडून जखमींना मदत आणि उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे.