Daund News : हिंगणीबेर्डी येथील शेतकरी आत्महत्या प्रकरणी १६ जणांवर गुन्हा दाखल, जमिनीच्या वादातून केली होती फसवणूक…

Daund News : पुनर्वसित दोन एकर जमिनीच्या खरेदी विक्री प्रकरणांमध्ये पूर्वी दस्त करूनही फसवणूक झाल्याने एका तरुण शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दौंड तालुक्यातील हिंगणीबेर्डी येथून समोर आली आहे. याप्रकणी आता पोलीस ठाण्यात १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लखन हरिभाऊ कोऱ्हाळे (वय ३२,रा. हिंगणीबेर्डी, ज्योतीबानगर, ता. दौंड, जि.पुणे) असे आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.
भगवान रामचंद्र खोमणे, महेश बबन शेंडगे, अशोक सिताराम जाधव,संदीप भगवान खोमणे, राहुल भगवान खोमणे, संजय रामचंद्र खोमणे, रोहीत संजय खोमणे, संभाजी रामचंद्र खोमणे, तानाजी रामचंद्र खोमणे, (सर्व रा. ज्योतीबानगर, हिंगणीबेर्डी ता. दौंड जि.पुणे ) श्रीकांत अनंता कानगुडे, नथुराम खंडु शेडगे, बायडाबाई आनंता कानगुडे, मारुती बबन शेडगे, अकुंश साधु शेडगे,आकाश गंगाराम शेडगे, (सर्व रा. पुणे ) व बाळासाहेब चौधरी (पुर्ण नाव माहीत नाही, रा. कानगाव ता. दौंड जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, की लक्ष्मण हरिभाऊ को-हाळे या शेतकऱ्यांने बुधवारी रात्री शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्याने गावातील व्हाट्सअप ग्रुप वर पुनर्वसन शेत जमिनी खरेदी विक्री व्यवहारात फसवणूक झाल्याने मी जीवन संपवत आहे. अशी चिट्टी लिहून त्यावर १६ जणांची नावे टाकली होती. याप्रकरणी भरत हरिभाऊ को-हाळे याने दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कोऱ्हाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जानेवारी सन २०२१ रोजी मध्ये गावातील नथुराम खंडु शेडगे, बायडाबाई आनंता कांनगुड़े, अनुसया खंडू शेडगे यांची काळेवाडी जमीन गट नं. २०६ मधील २ एकर जमीन विकायची असल्याने त्याबाबत एजंट महेश बबन शेडगे याने आम्हाला सांगीतले.
त्यानंतर वडील हरिभाऊ बाबा को-हाळे यांनी एजंट महेश शेडगे याचेसमक्ष चर्चा करुन सदरची जमीन एकरी १४ लाख रुपये प्रमाणे विकत घ्यायचे ठरले व इतर सर्व खर्च आम्हीच करायचा असे ठरले होते. भाऊ लक्ष्मण हरिभाऊ को-हाळे तसेच वडील हरिभाऊ को-हाळे यांनी वेळोवेळी ३० लाख रुपये जमीन खरेदी करीता बँक खात्यातुन व रोख स्वरुपात त्यांना दिले होते.
त्यानंतर १८ जानेवारी २०२२ रोजी त्यांनी केडगाव येथील दुय्यम् निबंधक कार्यालयात गिता को-हाळे यांच्या नावावर साठेखत व कुलमुक्तयार पत्र करुन दिले, व सदर जमीनीची भोगवटा १ ची तहसीलदार यांची मंजुरी आल्यानंतर सदरची जमीनीचे तुम्हाला खरेदी खत करुन देतो असे ठरले होते. त्यानंतर एक वर्षाने सदर जमीनीची दौंड तहसीलदार यांच्याकडून विक्रीची परवानगी घेतली. त्यानंतर ७ ऑक्टोंबर २०२३ रोजी त्यांनी केडगाव येथे या खरेदीखत करुन देतो असे सांगीतले.
त्यानुसार गिता भरत को-हाळे, वडील हरिभाऊ को-हाळे, भाऊ लक्ष्मण को- हाळे व एजंट महेश बबन शेडगे तसेच नथुराम खंडु शेडगे, बायडाबाई आनंता कानगुडे, अनुसया खंडु शेडगे व अशोक सिताराम जाधव केडगाव येथे गेले, त्यावेळी दुय्यम निंबधक ऑफिसच्या बाहेर त्यांनी आम्हाला सदर जमीनीचा खरेदीखत दस्त दाखविला व त्यावर माझ्या पत्नीच्या सह्या घेतल्या. त्यानंतर एका आठवड्याने गावामधील भगवान रामचंद्र खोमणे यांनी सदर जमीन विकत घेतली असल्याचे आम्हाला समजले.
त्यानंतर आम्ही ऑनलाईन पोर्टलवर जाऊन तपासले असता आमचे खरेदी खत झाले नसून साठेखत व कुलमुखत्यारपत्र रद्द झाले असल्याचे निर्दशनास आले. त्यावेळी सदर व्यक्तीनी आमची फसवणुक केलेली असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क झाला नाही. त्यानंतर २५ जानेवारी २०२३ रोजी रितसर यवत पोलीस ठाण्यात फसवणुकीबाबत तक्रार दाखल केली होती. Daund News
तसेच दौंड दिवाणी न्यायालयात रितसर दावा दाखल केला होता. मात्र आरोपींनी तुम्ही या जमीनीत यायचे नाही, शेतातुन जायचे नाही. असे म्हणून वेळोवेळी शिवीगाळ करून दमदाटी करुन जीवे मारण्याची धमकी देऊन मानसिक त्रास देवुन आमचे जीवण जगणे असह्य केले. त्यांच्या जाचला कंटाळून व जमीन व्यवहारात फसवणूक झाल्याने भाऊ लक्ष्मण को-हाळे त्यांच्या नावाची चिठ्ठी लिहून आत्महत्या केली.
दरम्यान, याप्रकणी पोलीस ठाण्यात १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.तसेच या घटनेने सध्या दौंड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.